Lockdown News: लॉकडाऊनच्या काळात ७० टक्के लोकांना घरपोच वस्तू - सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 02:35 AM2020-05-04T02:35:16+5:302020-05-04T02:35:52+5:30

‘लोकमत’तर्फे आयोजित गृहनिर्माण सोसायट्यांच्या वेबिनारमध्ये दिला घरीच राहण्याचा संदेश

Lockdown News: 70% of household goods during lockdown - Co-operation Minister Balasaheb Patil | Lockdown News: लॉकडाऊनच्या काळात ७० टक्के लोकांना घरपोच वस्तू - सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

Lockdown News: लॉकडाऊनच्या काळात ७० टक्के लोकांना घरपोच वस्तू - सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

Next

ठाणे : लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून ७० टक्के लोकांना अन्नधान्य, भाजीपाला घरपोच दिल्याची माहिती राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी शनिवारी दिली. दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्याकरिता सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशांना रस्त्यावर यावे लागले नाही, तर आपण कोरोनाच्या संकटावर लवकरात लवकर मात करू, असे पाटील म्हणाले.

‘लोकमत’ आणि महासेवातर्फे शनिवारी गृहनिर्माण संस्थांसाठी ‘कोरोना संकटात गृहनिर्माण सोसायट्यांनी घ्यायची खबरदारी,’ या विषयावर वेबिनार पार पडला. प्रीती किचन अप्लायन्सेसद्वारा समर्थित सारस्वत बँकेद्वारे तो सादर करण्यात आला. ‘लोकमत बेस्ट सोसायटी’ पुरस्काराच्या योजनेचा वेबिनार हा एक भाग होता. पाटील म्हणाले की, गृहनिर्माण संस्था व सहकारी संस्थांनी ३० एप्रिलपर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीला २५ कोटींची मदत दिली आहे. लॉकडाउनमुळे काही भागांत शेतकऱ्यांचा माल वेळेत न पोहोचल्याने त्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचा माल वेळेत ग्राहकांपर्यंत गेला पाहिजे, यासाठी शासनाने भूमिका घेतली आहे. त्याकरिता सहकार आणि पणन विभाग प्रयत्न करीत आहे.

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून भाजीपाला, किराणा लोकांपर्यंत दिला जात आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून मास्क बनविले जात आहेत. तसेच टिकाऊ आणि खाण्यायोग्य पदार्थ बनविण्याच्या सूचना बचत गटांना देण्यात आल्या आहेत. हाऊसिंग सोसायट्यांनी लॉकडाउनच्या काळात कशी काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन त्यांनी केले आणि लोकमतच्या बेस्ट सोसायटी पुरस्कार स्पर्धेत जास्तीत जास्त सोसायट्यांनी भाग घेण्याचे आवाहन केले.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात भाजपचे सरकार असताना शेतकºयांचा माल ग्राहकांना थेट मिळावा याकरिता आम्ही शेतकरी बाजार सुुरु करण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या संकटानंतर आता आपल्याला अ‍ॅपच्या माध्यमातून व्हर्च्युअल मार्केट निर्माण करावी लागतील. सरकारने या व्हर्च्युअल मार्केटला सक्रिय सहकार्य करावे. त्यामुळे शेतकरी व ग्राहक यांचा मोठा लाभ होईल. मार्केटिंगच्या कल्पकतेला वाव असून सेवा क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी या संकटानंतर निर्माण होतील, असे भाकित त्यांनी वर्तवले.

या सेमिनारमध्ये सहकार विभागाचे प्रशांत सोनावणे, संतोष पाटील, जे. डी. पाटील, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आक्रे, सारस्वत बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक अभिजित प्रभू, खा. गोपाळ शेट्टी, वीणा सर्व्हिसेसचे करण नायर, अभिनेत्री किशोरी शहाणे, आदिती सारंगधर, जयवंत वाडकर, माय सोसायटी क्लबचे सीईओ राजीव सक्सेना, डॉ. संजय पांढरे, एमएनएस मीडियाचे सुनील शर्मा व महाराष्ट्रातील ५८० सोसायट्यांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. ‘लोकमत’चे उपाध्यक्ष आणि बिझनेस हेड अनिरु द्ध हजारे, महासेवाचे अध्यक्ष सीए रमेश प्रभू यांनी सूत्रसंचालन केले.

एकत्र पद्धतीने अन्नधान्यवाटपाचे मॉडेल राबवा !
लॉकडाउन संपल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागणार आहे, मास्क लावून घराबाहेर जावे लागेल, गर्दीत जाणे आणि अनावश्यक बाहेर फिरणे यावर बंधने घालावी लागतील, असेही फडणवीस यांनी लक्षात आणून दिले. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनीही नागरिकांना सूचना आणि मार्गदर्शन केले. मुंबई ग्राहक मंचचे अध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी कोरोना संकटकाळात ग्राहकांना संघटित करून एकत्र पद्धतीने अन्नधान्याचे वाटप करण्याचे मॉडेल सोसायट्यांनी राबवावे, असे आवाहन केले.

Web Title: Lockdown News: 70% of household goods during lockdown - Co-operation Minister Balasaheb Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.