नागपूर – महाराष्ट्रात कोरोना तिसरी लाट सुरु झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नागपूरमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रात पसरवू नये यासाठी सरकार विविध प्रयत्न करत आहेत. नागपूरातील वाढते कोरोना रुग्ण पाहता सरकारने या जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहेत. पालकमंत्री नितीन राऊत यांनी माध्यमांशी बोलताना यावर सूतोवाच केले आहेत.
पालकमंत्री नितीन गडकरी म्हणाले की, नागपूरात तिसरी लाट आली आहे हे समजूनच प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. नागपूरातील रुग्णसंख्या कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी येत्या ३-४ दिवसांत नागपूरात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय होऊ शकतो. सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने महाराष्ट्रात धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याबाबत विचार सुरू आहे. नागपूरमध्ये वाढणाऱ्या रुग्णसंख्येने चिंता वाढवली आहे असं त्यांनी सांगितले.
नागपूरात तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज
नागपूरात कमीत कमी विकेंड लॉकडाऊन लावणं गरजेचे झाले आहे. त्यासाठी पुढील ३-४ दिवस परिस्थिती पाहिली जाईल. गेल्या दोन दिवसांपासून नागपूर जिल्ह्याने कोरोना बाधितांची दोन आकडी संख्या गाठली आहे. ही धोक्याची घंटा असून नागपूर तिसऱ्या लाटेच्या वाटेवर आहे. त्यामुळे वेळीच निर्बंध लावणे आवश्यक आहे. पुढील दोन-तीन दिवसात व्यापारी, उद्योजक व अनुषंगिक घटकांच्या बैठकी घेवून नागपूर जिल्ह्यामध्ये कडक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु करण्यात येत असल्याची माहिती मंत्री नितीन राऊत यांनी दिली.
तिसऱ्या लाटेची सुरुवात नागपूर जिल्ह्यात झाली आहे असे समजून उपाययोजना करण्याबाबत प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी एकमत व्यक्त केले. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची व शहरातील व्यापारी, दुकानदार, हॉकर्स, उद्योजक, हॉटेल व्यवसायी आणि माध्यम प्रतिनिधी यांच्या बैठकी घेवून कशा प्रकारचे निर्बंध लावायचे याबाबतचा निर्णय प्रशासनाने घ्यावा, पुढील तीन दिवसांत यासंदर्भातील निर्णय घोषित करावा अशी सूचना मंत्री नितीन राऊतांनी केली. सध्या रात्री दहापर्यंत हॉटेल्स सुरु आहेत. त्यावेळेत कपात करण्याबाबतचे सुतोवाच या बैठकीत करण्यात आले. प्रशासनामार्फत पुढील तीन दिवसानंतर नागपूर जिल्ह्यातील निर्बंधाची घोषणा केली जाणार आहे. नागरिकांनी मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे, गर्दी टाळणे आवश्यक असून दोन लसी घेतलेल्या नागरिकांपासून सगळ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.