मुंबई : निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयत्यावेळी बाहेरुन आलेल्या आयारामांना उमेदवारी देण्याचे पेव सध्या सर्वच राजकीय पक्षात फुटले आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केले तर उमेदवारी मिळू शकते, असा संदेश यातून गेला आहे.भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस अशा प्रमुख राजकीय पक्षांनी अशा आयारमांना गोंजारले आहे. याची सुरुवात अहमदनगरमधून झाली. भाजपाचे निष्ठावंत खासदार दिलीप गांधी यांना घरी बसवून विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ.सुजय यांच्या हाती कमळ देण्यात आले आहे. सुजय यांनी भाजपावर गेल्या महिन्यांमध्ये टोकाची टीका केली होती.चंद्रपूरमध्ये लोकसभेची उमेदवारी मिळालेले सुरेश उर्फ बाळू धानोरकर हे वषार्नुवर्षे कट्टर शिवसैनिक होते. गेल्या आठवड्यात त्यांनी आमदारकीचा आणि शिवसेनेचा राजीनामा दिला. काँग्रेसने विनायक बांगडे यांना दिलेली उमेदवारी बदलून ती धानोरकर यांना दिली. दिंडोरीतील भाजपाच्या उमेदवार डॉ. भारती पवार या परवापर्यंत राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष होत्या. भाजपाने विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना बाहेरचा रस्ता दाखवून भारती यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. भारती यांचे सासरे माजी मंत्री ए.टी.पवार हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपा अशा तिन्ही पक्षांमध्ये होते.रामटेकमध्ये काँग्रेसची उमेदवारी मिळालेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक उत्तर नागपूरमधून बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर लढली. ते दुसऱ्या क्रमांकावर होते.माढामधून भाजपाची उमेदवारी मिळालेले रणजितसिंह नाईक निंबाळकर परवापर्यंत सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार नरेंद्र पाटील सातारा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर लढणार आहेत. हातकणंगलेतील शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने हे पूर्वी राष्ट्रवादीत होते. बारामतीमध्ये भाजपाने उमेदवारी दिलेल्या कांचन कुल कोणत्याही पक्षात नव्हत्या पण त्यांचे पती राहुल कुल राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार आहेत. नंदुरबारमधील भाजपाच्या खासदार डॉ.हीना गावित यांचे वडील डॉ.विजयकुमार गावित यांचा प्रवास काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजपा असा आहे. कोल्हापुरातील शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीचे खासदार होते.अनेकांची पार्श्वभूमी पक्षांतराचीचराज्यातील काही महत्त्वाच्या उमेदवारांची या निवडणुकीपूर्वी पक्षांतर केले नसले तरी त्यांची पार्श्वभूमी पक्षांतराची आहे. खासदार रामदास तडस - वर्धा (काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजपा), नाना पटोेले - नागपूर (काँग्रेस-भाजपा-काँग्रेस), सांगलीचे खासदार संजयकाका पाटील (राष्ट्रवादी-भाजपा), धुळ्याचे खासदार डॉ.सुभाष भामरे (शिवसेना-भाजपा), भिवंडीचे खासदार कपिल पाटील (राष्ट्रवादी-भाजपा), शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे (भाजपा-शिवसेना), नांदेडमधील भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर (काँग्रेस-शिवसेना-भाजपा), नाशिकचे खासदार हेमंत गोडसे (शिवसेना-मनसे-शिवसेना), रामटेकचे खासदार कृपाल तुमाने (काँग्रेस-शिवसेना) यांचा समावेश आहे.