मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी जमत होती. मात्र, त्यांना मत मिळत नव्हती असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. आठवले सद्या दुष्काळ दौऱ्यावर असून रविवारी त्यांनी सोलापूर येथील दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी, ते बोलत होते.
राज ठाकरेंच्या विषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना आठवले म्हणाले की, राज ठाकरेंच्या सभा मोठ्या होत आहे. त्यांच्या सभांना मोठी गर्दी सुद्धा पहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सभा सुद्धा महाराष्ट्रात मोठ्या व्हायच्या, पण मते मिळत नव्हती. असा दावा आठवलेंनी सोलापूर मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. आठवलेंच्या या विधानावरून त्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना यावर आता काय उत्तर देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
आमच्या रोजच सभा होत असतात. राज हे एकच सभा घेतात आणि सगळीकडेचे लोक जमा करून गर्दी दाखवतात. शरद पवार आणि कॉंग्रेसने त्यांना मोठ बळ दिले आहे. राज यांच्याकडे गर्दी कशी जमवायची याचे नियोजन आहे. मात्र त्यांच्या सभेने महायुतीला फरक पडणार नसल्याचे आठवले म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपला महाराष्ट्रात ३७-३८ जागा मिळू शकतात, तर ४-५ जागा यावेळी कमी होण्याच्या अंदाज असल्याचे आठवले म्हणाले. सोलापूर मधील महायुतीचा उमेदवार निवडून येणार असल्याच्या दावा सुद्धा यावेळी आठवलेंनी केला.