मुंबई - काँग्रसतर्फे शुक्रवारी लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मराठवाड्यातील तीन मतदार संघातील उमेदवाराचे नाव प्रसिद्ध करण्यात आले आहे. औरंगाबादेतून सुभाष झांबड, जालन्यातून विलास औताडे आणि लातूरमधून मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापैकी जालना मतदार संघातू काँग्रेस उमेदवार विलास औताडे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना दुसऱ्यांदा आव्हान देणार आहे.
दानवे आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्यातील वादामुळे जालना मतदार संघ राज्य पातळीवर चर्चेत आला होता. आपण दानवे यांच्याविरुद्ध लढण्यासाठी उत्सुक असल्याचे खुद्द खोतकर यांनी म्हटले होते. परंतु शिवसेना-भाजप युती झाली. त्यानंतर खोतकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा होत्या. त्यामुळे काँग्रेसने जालन्यातील उमेदवारी वेटींगवर ठेवली होती. मात्र ऐनवेळी खोतकर यांनी माघार घेत काँग्रेसला तोंडघशी पाडले. त्यानंतर काँग्रेसने जालन्याची उमेदवारी विलास औताडे यांना दिली.
विलास औताडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केशवराव औताडे यांचे चिरंजीव आहेत. केशवराव यांनी प्रदिर्घ काळ औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. त्यांनी २०१४ मध्ये देखील दानवे यांना आव्हान दिले होते. त्यावेळच्या मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला होता. औताडे हे मागील चार महिन्यांपासूनच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले असून त्यांनी अनेक गावांत दौरे केले आहे.
जालना मतदार संघात औरंबादेतील सिल्लोड, फुलंब्री आणि पैठणचा समावेश आहे. सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांच्यामुळे फायदा औताडे यांना फायदा होण्याची शक्यता आहे. तर फुलंब्री मतदार संघात औताडे यांनी काम केलेले आहे.