मुंबई - काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेला अपक्ष उमदेवारी अर्ज मागे घेतला आहे. परंतु, सत्तार लोकसभा निवडणुकीत कुणाचा प्रचार करणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये, यामुळे आपण लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे सत्तार यांनी सांगितले.
औरंगाबादमधून काँग्रेसच्या वतीने सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या सत्तार यांनी औरंगाबादमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोनदा भेट देखील घेतली होती. त्यामुळे सत्तार भाजपमध्ये जाणार या चर्चांना उधाण आले होते.
गेल्या आठवड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आणि आ. सत्तार हे एकाच विमानातून मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचे वृत्त होते. परंतु, खा. दानवे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आ. सत्तार हे विमानात सोबत नव्हते. तसेच त्यांना भाजपचे सर्व दरवाजे बंद असल्याचे स्पष्ट केले, तर आ. सत्तार म्हणाले की, खा. दानवे यांनी मला विमानातून मुंबईला का नेले, हे तेच सांगू शकतील. या सर्व चर्चां रंगात आल्या असताना आता सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीत माघार घेतली आहे.