उद्धव ठाकरे आणि शरद पवार दिल्लीत जाणार, मविआमधील जागावाटपाचा तिढा चर्चेमधून सोडवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 02:19 PM2024-03-29T14:19:45+5:302024-03-29T14:20:31+5:30
Lok Sabha Election 2024: मविआमधील (Mahavikas Aghadi) घटक पक्षांमध्ये काही जागांवरून तिढा निर्माण झालेला आहे. त्यामधून एकमेकांवर काही आरोप प्रत्यारोपही होत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपावरून निर्माण झालेला तिढा आता दिल्ली दरबारी पोहोचला आहे.
राज्य आणि देशातील सत्ताधारी असलेल्या भाजपाचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातील विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. मात्र मविआमधील घटक पक्षांमध्ये काही जागांवरून तिढा निर्माण झालेला आहे. विशेषत: सांगली, भिवंडी आणि मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघांवरून शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे पक्ष आमने-सामने आले आहेत. त्यामधून एकमेकांवर काही आरोप प्रत्यारोपही होत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपावरून निर्माण झालेला तिढा आता दिल्ली दरबारी पोहोचला आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे रविवारी दिल्ली जाणार असून, तिथे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करून जागावाटपाबाबत चर्चा करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये एकत्र लढण्याचे निश्चित झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी अनेक जागांवर सामोपचाराने मार्ग काढला होता. मात्र काही जागांवर आघाडीतील सर्वच पक्षांनी दावा केलेला असल्याने तिथे एकमत होणे कठीण झाले आहे. त्यातच सांगली लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस हे आमने सामने आले आहेत. येथे उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर काँग्रेसचे विशाल पाटील हेही इथून लढण्यासाठी इच्छूक आहेत. उद्धव ठाकरे यांनी येथे परस्पर उमेदवार घोषित केल्यानेही काँग्रेसमध्ये नाराजी आहे.
तर दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांचं नाव जाहीर झाल्याने काँग्रेसकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याबरोबरच भिवंडी लोकसभा मतदासंघावरून काँग्रेस आणि शरद पवार गटामध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे या तिन्ही जागांवर आता दिल्लीत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे रविवारी दिल्लीला जाणार आहेत. तिथे या नेत्यांची काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी आणि के.सी. वेणुगोपाल यांच्याशी चर्चा होण्याची शक्यता आहे. या चर्चेनंतर महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.