निकालास होईल विलंब लोकसभा निवडणूक :प्रत्येक फेरीला एक तास लागणार
जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या निकालाची प्रक्रिया अधिक पारदर्शकरीत्या राबविण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेमुळे संपूर्ण निकाल सायंकाळी पाच वाजेपर्यंत लागण्याची शक्यता आहे. जर आयोगाच्या प्रत्येक सूचनेनुसार मतमोजणी झाली तर आणखी विलंब होऊ शकतो. निवडणूक निरीक्षकांच्या भूमिकेवर सर्व काही अवलंबून राहणार आहे. केंद्र सरकारचेही कर्मचारी मतमोजणी करणार जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी २४ एप्रिल रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी १६ मे रोजी होणार आहे. निकालाची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या कर्मचार्यांसोबत निवडणूक आयोगाचे म्हणजेच केंद्र शासनाचेही कर्मचारी टेबलवर बसून मतमोजणी करणार आहे. झेरॉक्स प्रत देणार दोन्ही विभागाच्या कर्मचार्यांची आकडेवारी जुळल्यानंतर उमेदवारांच्या प्रतिनिधीला आकडेवारीची झेरॉक्स प्रत देण्यात येईल, त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल. दरम्यान, मतमोजणीबाबत नियोजन करण्यासाठी साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्यांची बुधवारी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. मतमोजणीसाठी बॅरिकेटसची बुधवारपासून उभारणी करण्यात येणार आहे. तीन गोडावूनमध्ये मतमोजणी होणार आहे. खबरदारी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार मनीष जैन यांच्यातर्फे राज्य वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये रात्रंदिवस दोन कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रशासनातर्फे केंद्रीय व राज्य सुरक्षा बल आणि पोलीस असा त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्त तैनात आहे़ जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी २७ तर रावेर मतदारसंघासाठी मतमोजणीच्या एकूण २२ फेर्या होतील. प्रत्येक फेरीला साधारणत: एक तास लागणार आहे. त्यामुळे दुपारपर्यंत संपूर्ण निकाल घोषित होण्याची आशा कमीच आहे. जास्त वेळ लागण्याची शक्यता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.