मुंबई : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी ‘लोकमत’च्या सरपंच ऑफ द इअर (पर्यावरण विभाग) या पुरस्काराचा मान सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ गावचे सरपंच अंकुश रामचंद्र गुंड यांना प्रदान करण्यात आला.
गट - पर्यावरणसरपंचाचे नाव - अंकुश रामचंद्र गुंडगाव - अनगर/कोंबडवाडीतालुका - मोहोळजिल्हा - सोलापूर
जाणून द्या, अंकुश गुंड यांच्याविषयी...अंकुश रामचंद्र गुंड यांनी सरपंच झाल्यापासून गावामध्ये पर्यावरणविषयक जागृतीच्या दृष्टीने अनेक सुधारणा केल्या. २०१७-१८मध्ये गावामध्ये असलेल्या पिण्याच्या पाण्याची शास्त्रीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर गावात शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आर. ओ. प्लांट बसविण्यात आला. ताशी २ हजार लीटर वेगाने या प्लांटमधून पाणी शुद्ध केले जाते. ५ टनाचा चिलर, कॉइन बॉक्स व पंच कार्ड यंत्रणेसहही प्लांट सुविधा गावकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी अनगर नाल्यातील गाळ श्रमदानातून काढला आहे. गावातील एकुण ११५ वीजपोलवर एल. इ. डी. लाई बसवून उर्जेची बचत केली आहे. गावात पाचपीर, सावतामाळी मंदिर, इनाम वस्ती, कॉलेज परिसर येथे सौर उर्जेचे १ एच. पी. पंप बसवून वीजेची बचत केली आहे.वाड्यावस्तीवर लाईट नाही त्याठिकाणी सौरउर्जेवरील एकुण २१६ सौर दिवे बसवून वापरात आहेत. गावामध्ये ११ बायोगॅस यंत्रे बसविण्यात आली असून ती सर्व उत्तमरितीने कायान्वित आहेत. सरपंच अंकुश रामचंद्र गुंड यांनी गावात स्वच्छता राहावी यासाठी घंटागाडीचे नियोजन केले आहे. गावात बहुतांशी ठिकाणी सेप्टीटँक असून वाड्यावस्त्यांवर शौष खड्ड्यांचे शौचालय आहे. २०११-१२ मध्ये गावास निर्मल ग्राम पुरस्कार व २०१६-१७मध्ये गावाला हागणदारीमुक्त घोषित करण्यात आले.वृक्षारोपण कार्यक्रमादरम्यान लोकवाटा माध्यमातून ५०० ट्री गार्डन बनवून १७०० झाडे लावण्यात आली. ४५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचा ठराव १३ सप्टेंबर २०१७ रोजी ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. या पर्यावरणस्नेही प्रयत्नांमागे सरपंच अंकुश रामचंद्र गुंड यांची प्रेरणा आहे.
राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस २५ लाखपंचायतराज व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असून, ‘लोकमत’चा सरपंच आॅफ द ईअर पुरस्कार पटकाविणाऱ्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये तर विविध गटातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचातयींना प्रत्येकी दहा लाखांचा विकास निधी देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. दरम्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, ज्युरी मंडळाचे अध्यक्ष तथा ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, आदर्श सरपंच पोपटराव पवार, बीकेटी टायर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार उपस्थित होते.