मुंबई : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी ‘लोकमत’च्या सरपंच ऑफ द इयर (पायाभूत सुविधा) या पुरस्काराचा मान अकोला जिल्ह्यातील धाबा गावच्या सरपंच नीता सुनील पाटील धाबेकर यांना मिळाला.
गट- पायाभूत सुविधासरपंचाचे नाव - नीता सुनील पाटील धाबेकरगाव - धाबातालुका - बार्शीटाकळीजिल्हा - अकोलाधाबा गावामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरपंच नीता सुनील पाटील धाबेकर यांच्या नेतृत्वाखाली उत्तम कार्य सुरु आहे. धाबा ग्रामपंचायतीमार्फत संपूर्ण गावात शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येतो. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या तीन विहिरी, दोन बोअर वेल असून त्यावरून गावात नळयोजनेच्या माध्यमातून दररोज पाणीपुरवठा केला जातो. प्रत्येक कुटुंबाकडे नळ असन वार्षिक पाणीकर आकारणी३६० रुपये आहे. त्याची करवसुली कार्यक्षमतेने केली जाते. संपूर्ण गावात गटार व्यवस्था असून त्याद्वारे सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यात येते. जिथे गटारव्यवस्था नाही तिथे नांदेड पॅटर्नचे शोषखड्डे करण्यात आलेले असून उघड्यावर पाणी सांडण्यात येत नाही. संपूर्ण गावात बंदिस्त गटारव्यवस्था आहे.जलसंधारणाच्या बाबतीत गावाने २०१५-१६ सालामध्ये जलयुक्त शिवार अभियानात भाग घेतला. नाला खोलीकरण तसेच नाला सरळीकरण या कामांबरोबरच गावातील लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्षलागवडही करण्यात आली आहे. स्मार्ट ग्राम माध्यमातून कॅशलेसच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी ग्रामस्थांकरिता काही उपक्रम राबविले जात आहेत. गावात सौरदिव्यांनी युक्त अभ्यासिका असून त्याचा विद्यार्थी लाभ घेतात. प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडा बाजार शेड यांसाठी सुसज्ज वास्तू आहेत. गावात उत्तम दर्जाचे रस्ते बांधले आहेत. धाबा ग्रामपंचायतीला आजवर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. या गावात सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधांनी युक्त करण्यासाठी नीता सुनील पाटील धाबेकर या प्रयत्नशील आहेत.
राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस २५ लाखपंचायतराज व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असून, ‘लोकमत’चा सरपंच आॅफ द ईअर पुरस्कार पटकाविणाऱ्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये तर विविध गटातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचातयींना प्रत्येकी दहा लाखांचा विकास निधी देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. दरम्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, ज्युरी मंडळाचे अध्यक्ष तथा ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, आदर्श सरपंच पोपटराव पवार, बीकेटी टायर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार उपस्थित होते.