मुंबई : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी ‘लोकमत’च्या सरपंच ऑफ इयर या पुरस्काराचा मान नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील शितलवाडी (परसोडा) गावाच्या सरपंच योगिता दिगंबर गायकवाड यांना मिळाला.
गट - सरपंच आॅफ द इयर सरपंचाचे नाव - योगिता दिगंबर गायकवाडगाव - शितलवाडी (परसोडा)तालुका - रामटेकजिल्हा - नागपूर
कोण आहेत सरपंच योगिता गायकवाड?खैरी बिजेवाडा या ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन शितलवाडी (परसोडा) ही नवी ग्रामपंचायत ७ जून २०१३ रोजी अस्तित्वात आली. शितलवाडी (परसोडा) ग्रामपंचायतीची पहिली सरपंच व पहिली महिला सरपंच म्हणून योगिता दिगंबर गायकवाड निवडून आल्या. योगिता यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. नगरधन, शितलवाडी, परसोडा, नवरगाव अशा एकुण १४ गावांसाठी नगरधन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना २००७मध्ये अमलात आली. तिला १५ कोटी रुपयांचा खर्च होता. पण ही योजना अनेक कधी शासकीय अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे तर कधी ग्रामपंचायतींच्या असहकार्यामुळे अडचणीत आली होती. या योजनेतून पाणी घेताना व वीज बिले भरताना ग्रामपंचायतींची दमछाक व्हायची. त्यामुळे बहुतेक ग्रामपंचायतींनी या योजनेतून माघार घेतली. सदर योजना चालविण्याकरिता एक शिखर समितीही स्थापन करण्यात आली होती. शितलवाडी (परसोडा) ग्रामपंचायतीच्या सरपंच बनल्यानंतर या शिखर समितीच्या अध्यक्षपदी योगिता यांची निवड झाली. त्यावेळी नगरधन प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून पाणी घेऊ इच्छिणाºयांपैकी शितलवाडी व परसोडा यांचा निर्धार कायम होता. मात्र केवळ दोन गावांच्या भरवशावर योजना चालविणे शक्य नव्हते. तेव्हा रामटेक नगरपालिकेचा छोरिया लेआऊट हा भाग योजनेत समाविष्ट करुन घेतला. अजून काही भाग समाविष्ट करुन घेतले. नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांपासून अनेक शासकीय अधिकारी, विविध गावांतील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी यांच्याशी योगिता गायकवाड यांनी चर्चा केली. फिल्टर प्लांट व वीज बिलाची असलेली ११ लाख रुपयांची थकबाकी या गावांनी भरुन मोकळा श्वास घेतला. आता ही पाणीपुरवठा योजना सर्वांच्या सहभागाने व्यवस्थित सुरु आहे. गुड गव्हर्निंग इन पंचायत राजसंदर्भात दिल्ली येथील नीती आयोगाच्या बैठकीचे निमंत्रण महाराष्ट्रातील तीन सरपंचांना मिळाले. त्यामध्ये योगिता गायकवाड या महाराष्ट्रातील एकमेव महिला सरपंच होत्या. गावात मोटारी लावून पाणी चोरी केली जाते. याला आळा बसावा म्हणून लोकांचा रोष सहन करुन समान पाणी वाटपासाठी फेरुल या उपकरणाचा वापर योगिता गायकवाड यांनी शितलवाडी (परसोडा) गावात केला. फेरुलचा प्रयोग करणारी ही पहिलीच ग्रामपंचायत आहे. शितलवाडी (परसोडा) हे गाव शंभर टक्के साक्षर आहे. आरोग्यापासून शिक्षण, ई-प्रशासनाच्या उत्तम सुविधा ग्रामपंचायतीत योगिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्या आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेता त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येत आहे.
राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस २५ लाखपंचायतराज व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असून, ‘लोकमत’चा सरपंच आॅफ द ईअर पुरस्कार पटकाविणाऱ्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये तर विविध गटातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचातयींना प्रत्येकी दहा लाखांचा विकास निधी देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. दरम्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, ज्युरी मंडळाचे अध्यक्ष तथा ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, आदर्श सरपंच पोपटराव पवार, बीकेटी टायर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार उपस्थित होते.