मुंबई : खासगी वाहतुकीशी स्पर्धा करतानाच प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाकडून नवनवे प्रयोग केले जात आहेत. बसची प्रतीक्षा करणाऱ्या आरक्षित प्रवाशांना बसचा ठावठिकाणा समजण्यास मदत व्हावी यासाठी एसटी महामंडळाने मोबाइलवरच त्याची माहिती मोबाइलवरच एका ‘मॅप’द्वारे ही माहिती देण्यात येईल. याचा पहिला प्रयोग एसी शिवनेरी बस प्रवाशांसाठी केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. हा नवीन प्रस्ताव सध्या प्राथमिक स्तरावर आहे. एसटीच्या आॅनलाइन सेवांबरोबरच तिकीट खिडक्यांवर तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा लवकरच उपलब्ध करण्यात येईल. त्यामुळे प्रवासी बस सुटण्याआधी वाहकाला फोन करून आपण ‘त्या’ बसचे प्रवासी असल्याची माहिती देईल. तर एसटी वाहकाकडूनही प्रवाशाशी संपर्क साधत बस पोहोचत असल्याची माहिती देण्यात येणार आहे. या प्रस्तावाबरोबरच एसी शिवनेरी बस प्रवाशांसाठीही नवीन प्रस्ताव तयार केला जात आहे. सध्या एसी बसमध्ये जीपीएस यंत्रणा आहे. जीपीएस यंत्रणेद्वारे स्मार्ट फोन वापरणाऱ्या आरक्षित प्रवाशांना बसचा आधीच ठावठिकाणा मोबाइलवरच देण्यात येईल. प्रवाशांच्या मोबाइलवर एक लिंक पाठवण्यात येईल आणि बसची माहितीही असेल. या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक मॅप दाखवला जाईल. त्या मॅपद्वारे बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना बस कोणत्या ठिकाणी आहे ते मोबाइलवरच पाहता येईल. प्रवासावेळीही आपण कुठे पोहोचलो आहे याची माहितीही प्रवाशांना मिळणार आहे. प्रस्तावावर काम सुरू असून तो प्रत्यक्षात सेवेत येण्यास थोडा कालावधी लागेल, असे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)<एसटी महामंडळाच्या ताफ्यात १२३ शिवनेरी बस आहेत. मुंबई ते पुणे, ठाणे ते पुणे आणि औरंगाबाद, नाशिक मार्गांसह काही मार्गांवर या बस धावत आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांच्यासाठी प्रथम ही सेवा सुरू करण्यावर भर दिला जात आहे. त्यानंतर अन्य बसमध्येही जीपीएस यंत्रणा बसवल्यानंतर ही सेवा दिली जाईल.
मोबाइलवरच पाहा एसटीचा ठावठिकाणा
By admin | Published: March 06, 2017 5:28 AM