मुंबई - 'एसटीचा प्रवास, सुखकर प्रवास' अशी बिरुदावली असणाऱ्या एसटीतून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि सर्व महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांमुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यामुळे काहीशी तोट्यात रुतलेली एसटी नफ्याकडे धावताना पाहायला मिळत आहे. मे मध्ये एसटीला ८७६ कोटी ३३ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न एकूण खर्चाच्या १६ कोटीने कमी असून, येत्या काही महिन्यांमध्ये एसटीला दरमहा नफा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटीला 'अच्छे दिन' येतील, असा विश्वास महामंडळाने व्यक्त केला आहे.
मे महिन्यात एसटीचे उत्पन्न हे वर्षातील सर्वाधिक उत्पन्न असते. एसटीच्या एकूण ३१ विभागापैकी १४ विभाग हे नफ्यामध्ये आले असून इतर विभागांचा तोटा काही लाखांमध्ये आहे. सध्या प्रवासी गर्दीच्या तुलनेत एसटीच्या बस कमी पडत आहेत. तरी एसटीच्या अभियांत्रिकी विभागाच्या कामगिरीमुळे यंदा मागील वर्षीच्या तुलनेत १ हजार जादा बस प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मे-२०२३ मध्ये १३ हजार ८०० बस रस्त्यावर धावत होत्या. मे-२०२४ मध्ये ही संख्या १ हजाराने वाढून १४ हजार ८०० पर्यंत पोहोचली. अनेक नादुरुस्त बस तांत्रिकदृष्ट्या सक्षम करून प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्याकरिता एसटीचे यांत्रिक कर्मचारी काम करत आहेत.
नफा कमवणारे पहिले ५ विभाग१) जालना - २.४६ कोटी२) छ. संभाजीनगर - २.४४ कोटी३) बीड - २.१० कोटी४) परभणी - १.६३ कोटी५) धुळे - १.६२ कोटी