लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : एखाद्या कंपनीत वाहन अथवा मोटार भाडे कराराने दिल्यास जेवढी रक्कम वाहनमालकाच्या हाती पडते, त्याच्या कितीतरी पट अधिक रक्कम तरूणींच्या एस्कॉर्टसाठी वापरात येणाऱ्या मोटारमालकांच्या हातात पडते. अवघ्या दीड ते दोन किलोमीटर अंतराच्या मार्गावर दिवसभर घिरट्या मारण्यासाठी दिवसाकाठी एका मोटारचालकाला दोन हजार रूपये मिळतात. महिन्याकाठी ही रक्कम ९० हजारांच्या घरात जाते. ताथवडेतील एका अड्ड्यावरून तरूणींना मोटारीत घेतले जाते. तेथून ग्राहकाच्या मागणीनुसार जवळच्या त्यांच्याशी संबंधित लॉजवर नेण्याची व्यवस्था केली जाते. या मार्गावर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायातून कोट्यवधींची आर्थिक उलाढाल होत आहे. ताथवडे परिसरात मुंबई-बंगळुरू महामार्गालगत गेल्या काही वर्षांत वेश्या व्यवसायाचे रॅकेट फोफावले आहे. मध्यंतरीच्या काळात हा प्रकार थांबला होता. पुढे देहूरोड हद्दीत रस्त्यालगतची हॉटेल, लॉज यामध्ये सर्रासपणे हा प्रकार सुरू होता. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. देहूरोड हद्दीतील लॉजवर छापे टाकून कारवाई करण्यात आली. देहूरोड हद्दीतील वेश्या व्यवसाय बंद होताच, ताथवडेत हा व्यवसाय अधिक प्रमाणात विस्तारला आहे. देहूरोडचा भाग ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येतो, तर ताथवडे हा परिसर शहरी भागात हिंजवडी पोलिसांच्या हद्दीत येतो. ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत कारवाई होताच, त्या भागातील दलाल ताथवडे हद्दीत कार्यरत होताना दिसून येतात. हद्द ग्रामीण पोलिसांची असो, की शहर पोलिसांची त्या भागात वेश्या व्यवसायासाठी तरुणी पुरविणारे रॅकेट एकच असते. तरुणींचा पुरवठा करणारी यंत्रणा एकच असल्याने त्यांना काही फरक पडत नाही.अगदी चार हजार रूपयांपासून ते २० हजारापर्यंत किंमत मोजण्याची तयारी असलेले ग्राहक या भागात येताना दिसून येतात. ताथवडे येथे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या लॉजच्या आवारात आलिशान मोटारी जाताना दिसतात. पुणे, हडपसर, कात्रज, तसेच पुण्याबाहेरून येणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण अधिक आहे. अशा ठिकाणी स्थानिकांचा वावर कमी आहे. तरुणींच्या ‘एस्कॉर्ट’साठी या भागात घिरट्या मारणाऱ्या सुमारे ५० मोटारी आहेत. पिवळ्या नंबरप्लेटच्या काळ्या काचेच्या या मोटारी राजरोसपणे तरुणींना घेऊन घिरट्या मारतात. या व्यवसायामुळे पान टपरीचालक, तसेच अन्य विक्रेते यांच्याही व्यवसायाला बरकत मिळाली आहे. तरूणींच्या एस्कॉर्टची यंत्रणा चालविणाऱ्यांमध्ये सुमारे २०० हून अधिक लोक कार्यरत आहेत. त्यात काही लोक मोटारीतून फेरफटका मारून ग्राहकांना तरूणी दाखविण्याचे काम करतात, तर काही लोक कोणी संशयित येत आहे का, याची पाहणी करतात. काहीजण मोबाइलवर ग्राहकांशी सातत्याने संपर्क साधण्यात व्यस्त असतात. काही दिवसांचे कॉन्ट्रॅक्ट १ताथवडे वेश्या व्यवसायाच्या रॅकेटमध्ये सामील होणाऱ्या तरुणींबरोबर १५ दिवसांचे, तसेच महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट केले जाते. मोठ्या कालावधीसाठी हे कॉन्ट्रॅक्ट केले जात नाही. कॉन्ट्रॅक्ट केलेल्या विशिष्ट कालावधीची रक्कम तरुणींना अगोदरच अदा केली जाते. एका ठिकाणचे कॉन्ट्रॅक्ट संपताच तरूणी दुसऱ्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट करतात. त्यांचे हे कॉन्ट्रॅक्ट ५० हजारांपासून ते अडीच लाखांपर्यंत असते. कॉन्ट्रॅक्ट रकमेपोटी दिलेल्या रकमेच्या कितीतरी पट अधिक नफा सेक्स रॅकेटवाले मिळवितात. कॉन्ट्रॅक्ट संपताच त्यांच्याच संबंधातील दुसऱ्या यंत्रणेकडे तरुणींना पाठविले जाते. कॉन्ट्रॅक्ट करणाऱ्या तरुणींमध्ये परप्रांतीय मुलींचे प्रमाण अधिक आहे. बांग्लादेशी, नेपाळी तरुणींचा अधिक भरणा आहे. तरुणींची राहण्या-खाण्याची व्यवस्था रॅकेट चालविणारेच करतात. एकदा कॉन्ट्रॅक्ट झाले, की कॉन्ट्रॅक्ट करणाऱ्यांच्या मर्जीनुसार राहणे भाग पडते. ते सांगतील त्या वेळी, सांगतील त्या ठिकाणी जाणे भाग पडते. ग्राहकाकडून मिळालेली बक्षिसाची (टिप) रक्कम त्या तरुणींची अधिकची कमाई असते. दर निश्चिती होते त्यानुसार ती रक्कम लॉजच्या काउंटरवर जमा केली जाते. ही रक्कम तरुणींच्या हाती पडत नाही. पान टपऱ्यांनाही सुगीचे दिवसताथवडे परिसरातील हॉटेल, लॉजचालकांची सेक्स रॅकेटमुळे चांदी झाली आहे. तर पानटपरी चालकांनादेखील सुगीचे दिवस आल्याचे पहावयास मिळत आहे. दिवसभर कोणीही फिरकत नाही, अशा हॉटेलांमध्ये सायंकाळ होताच तरूणांची घोळकी जमा होतात. रात्री या परिसरातील बहुतांश हॉटेल गर्दीने फुलून जातात. ताथवडे परिसरात तरुणींची एस्कॉर्ट दुपारी १२ वाजल्यापासून ते रात्री एक वाजेपर्यंत सुरू असते. दिवस-रात्र हा प्रकार सुरू असल्याने या परिसरात वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. ...संगनमताचा कारभार या भागातील व्यावसायिक संगनमताचा कारभार करू लागले आहेत. एकाच भागात हॉटेल आणि लॉजिंग व्यवसाय करत असताना त्यांच्यात व्यावसायिक स्पर्धा दिसून येणे अपेक्षित आहे. परंतु व्यावसायिक स्पर्धेपेक्षा त्यांनी आपापसात संगनमत केले आहे. हॉटेल, लॉजबाहेरील पान टपरीचालकसुद्धा त्यात सहभागी आहेत. संगनमताचा कारभार असल्याने ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशी परिस्थिती तेथे अनुभवास येते. सोशल मीडियाचा वापरतरूणींचे एस्कॉर्ट रॅकेट चालविणाऱ्यांनी सोशल मीडियाचा अवलंब करून ग्राहकांचे नेटवर्क तयार केले आहे. ग्राहकांनी व्हॉट्स अॅपवर संपर्क साधून तरूणींच्या छायाचित्राची मागणी करताच काही सेकंदांत एकापाठोपाठ एक छायाचित्र पाठविली जातात. त्यानंतर दलाल ग्राहकांशी संपर्क ठेवतात. ग्राहकाच्या मागणीनुसार तरूणी उपलब्ध करून देण्यासाठी दलाल कमालीची तत्परता दाखवितात. पूर्वी लॉजवर गेल्यानंतर तरूणी दाखविल्या जात असत. आता व्हॉट्स अॅपवर तरूणींची छायाचित्रे पाठवून ग्राहकांची पसंती जाणून घेतली जाते.
‘एस्कॉर्ट’साठी आलिशान मोटारींचा वापर
By admin | Published: July 08, 2017 2:32 AM