मुंबई - २७ फेब्रुवारी, हा ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या कुसुमाग्रजांचा जन्मदिन म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन! याही वर्षी महाराष्ट्र शासनातर्फे भव्य आणि विविधांगी कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होणार आहे. मंगळवार, दि. २७ फेब्रुवारी, २०१८ रोजी सायंकाळी ६.०० वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे साहित्य व भाषाविषयक पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होत आहे. या कार्यक्रमात मराठी भाषा विभागाचे सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्याबरोबरच, मराठी भाषा हे मध्यवर्ती सूत्र असलेला सांगीतिक कार्यक्रमही सादर होणार आहे. तसेच विविध साहित्य प्रकारांचे ३५ राज्य वाङ्मय पुरस्कारही प्रदान केले जाणार आहेत. याच कार्यक्रमात गेल्या वर्षभरातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मराठी साहित्यिकांचा विशेष सन्मानही केला जाणार आहे, अशी माहिती मराठी भाषा मंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.
या वर्षीचा कविवर्य विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार श्री. मधु मंगेश कर्णिक यांना, श्री.पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुणे येथील वरदा प्रकाशनाला, डॉ. अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कार श्री. अविनाश बिनीवाले यांना आणि कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार मराठी विज्ञान परिषद या संस्थेला प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार सोहळ्यादरम्यान सुप्रसिद्ध कलाकार रवींद्र साठे, उत्तरा केळकर यांच्यासह अनेक प्रथितयश कलाकार ‘मराठीच्या पोतडीतून’ हा मराठी भाषेची वैशिष्ट्ये सांगणारा कार्यक्रम सादर करणार आहेत. तसेच या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या १५ दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशनही होत आहे.
यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विधानभवन परिसरात, महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे सभापती श्री. रामराजे निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष श्री. हरिभाऊ बागडे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, सभागृहनेते श्री. चंद्रकांत (दादा) पाटील, विधानपरिषदेचे उपसभापती श्री. माणिकराव ठाकरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते श्री. धनंजय मुंडे, विधानसभा विरोधी पक्षनेते श्री. राधाकृष्ण विखे-पाटील, संसदीय कार्य मंत्री श्री. गिरीश बापट, यांच्यासह विधिमंडळाचे सर्व सदस्य आणि पुरस्कार विजेते साहित्यिक, मराठी अभिमान गीताचे (लाभले आम्हास भाग्य... गीत - सुरेश भट) समूहगायन करणार आहेत. संगीतकार श्री. कौशल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली या समूहगीताचे गायन, दि. २७ रोजी सकाळी १०.०० वाजता होणार आहे. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व पुरस्कार विजेत्या साहित्यिकांच्या अभिनंदनाचा ठरावही, दोन्ही सभागृहांत दि. २७ रोजीच मांडला जाणार आहे. तसेच या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्येही सकाळ सत्रात ११ वाजता व दुपार सत्रात ४ वाजता मराठी अभिमान गीताचे समूहगायन होणार आहे.
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने, यंदा चलभाषावरील (मोबाईल) आणि संगणकावरील मराठी ह्या विषयांना प्राधान्य देणारे विविध उपक्रम होत आहेत. लिपिकार (स्पीच-टु-टेक्स्ट) व स्वरचक्र यांसारख्या विनामूल्य ॲप्सच्या माध्यमातून मोबाईलवर मराठी टंकलेखन करण्याच्या उपक्रमास प्राधान्य देण्यात येत आहे. संगणकावर मराठीचा वापर वाढण्यासाठी युनिकोड आधारित मराठी कार्यान्वित करणे गरजेचे आहे. युनिकोड - मराठी संगणकावर कशी सुरु करावी, याची माहिती देणारी चित्रफीत महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरील मुखपृष्ठावर चलतचित्र विभागात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व मराठी संगणक वापरकर्त्यांनी युनिकोड-मराठी वापरण्यास सुरूवात करून, मराठी भाषेच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहनही श्री. विनोद तावडे यांनी केले.
भारतातील पहिल्या पुस्तकांच्या गावात, भिलार, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा येथेही यंदा मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात, ‘अमृताचिये मराठी’ या कार्यक्रमाद्वारे साजरा केला जाणार आहे. यात पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासह अनेक प्रथितयश कलाकार सहभागी होत आहेत. महाराष्ट्रातील अकरा (११) विद्यापीठांच्या माध्यमातून राज्यातील विविध शहरांत मराठी भाषेची स्थित्यंतरे दर्शविणारे दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम मराठी रसिकांसाठी सादर करण्यात येणार आहेत. ह्या विविध कार्यक्रमांत सुमारे ५०० प्रथितयश कलाकार हजारो रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत सादरीकरण करणार आहेत.
मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच दि. २६ फेब्रुवारी, २०१८ रोजी सायंकाळी, महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. सी. विद्यासागर राव, राजभवन येथे मान्यवर साहित्यिकांशी अनौपचारिक संवाद साधणार आहेत आणि भाषा गौरव दिनाच्या उत्सवात आपला सहभाग नोंदवणार आहेत. मंगळवार, दिनांक २७ फेब्रुवारी, २०१८ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, मुंबई येथे होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या मुख्य कार्यक्रमासह महाराष्ट्रातील सर्व कार्यक्रमांमध्ये, त्या त्या ठिकाणच्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आवर्जून सहभागी व्हावे, असे आग्रही आवाहन विनोद तावडे यांनी शेवटी केले. पुरस्कार निवड समितीमध्ये बाबा भांड, सदानंद मोरे, दिलीप करंबेळकर, शामाताई घोणसे, श्रीपाद भालचंद्र जोशी या सदस्यांचा समावेश असल्याची माहिती श्री तावडे यांनी सांगितली.