मुंबईत आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपासंदर्भात अद्याप महाविकास आघाडीमध्ये एकमत झालेले नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होणार? आजची बैठक यशस्वी होणार का? याकडे राजकीय वर्तुळातील लोकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भात आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे.
महाविकास आघाडीच्या या बैठकीला काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. तर ठाकरे गटाकडून शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खा. संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, खा. सुप्रिया सुळे आणि आ. जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत. मुंबईमधील ट्रायडेंट हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडणार आहे.
आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत मतदारसंघनिहाय चर्चा होणार आहे. कोणता पक्ष किती आणि कोणती जागा लढवणार? याबाबत आज चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील घटक पक्षामध्ये जागावाटपावरुन अद्याप एकमत झाले नाही. शिवसेना 23 जागांवर ठाम आहे. तर, काँग्रेसलाही जास्त जागा हव्या आहेत. त्यामुळे गेल्या बैठकीत यावर तोडगा निघालेला नाही. तसेच, प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांना तीन जागा देण्याबाबत चर्चा सुरु आहे. याबाबत आज निर्णय होऊ शकतो.
आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्षपश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि पंजाबमध्ये आपसोबत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून काँग्रेससोबत एकमत झाले नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी 'इंडिया' आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये काँग्रेसचे स्थानिक पक्षांसोबत सूर जुळले नाहीत. मात्र, राज्यात जागावाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये अद्याप सूर बिनसलेले नाहीत. तसेच, ठाकरे गटाला मिळणाऱ्या सहानुभूतीचा कल पाहू काँग्रेसने उद्धव ठाकरेंच्या कलानेच घेण्याचा निर्णय घेतला आहे.