ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी 'महाराष्ट्र 2035' रोड मॅप तयार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 09:01 PM2024-03-06T21:01:00+5:302024-03-06T21:02:35+5:30
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सन 2035 मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापनेला 75 वर्षे होत आहेत. यानिमित्ताने आम्ही एक व्हिजन तयार करत आहोत.
मुंबई : महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, उद्योगस्नेही वातावरण व धोरणांमुळे गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. राज्यात आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना करण्यात आली असून या परिषदेने महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्यासाठी 'महाराष्ट्र 2035' हा रोड मॅप तयार केला आहे. याद्वारे महाराष्ट्र हे देशात अग्रस्थानी राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. इंडिया ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने आयोजित नेक्स्ट टेन – वार्षिक गुंतवणूक परिषदेच्या (अन्युअल इन्व्हेस्टमेंट समिट) कार्यक्रमात द महा ग्लोबल स्टोरी @75 या सत्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत झाली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात होत असलेल्या पायाभूत सुविधा, त्यामुळे येणारी गुंतवणूक व उद्योग यांची माहिती दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सन 2035 मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापनेला 75 वर्षे होत आहेत. यानिमित्ताने आम्ही एक व्हिजन तयार करत आहोत. सुरक्षितता, मजबूत, सामाजिक पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि शाश्वतता यावर लक्ष केंद्रीत करत आहोत. यामुळे राज्याला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने पुढे नेण्यास मदत होत आहे. डॉईश्च बँकेने जाहीर केलेल्या गुंतवणूकविषयक अहवालात नमूद केल्यानुसार, सन 2029 पर्यंत देशातील मोठ्या पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या एकूण गुंतवणुकीपैकी ५० टक्के गुंतवणूक ही राज्यात होणार आहे. विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी पायाभूत सुविधा आवश्यक असून त्याबरोबरच राज्यात शाश्वत विकासावर भर देण्यात येत आहे.
सामाजिक पायाभूत सुविधांचा विचार करता राज्यात सर्वाधिक विद्यापीठे असून नॅक नामांकन असलेल्या सर्वाधिक संस्था राज्यात आहेत. आयआयटी, आयआयएम आहेत, सर्वाधिक खासगी वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. आरोग्य क्षेत्रातही व्यापक बदल होत असून पुढील काही वर्षात राज्यात 50 हजार बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र, सुमारे 1 लाख बेड तयार करण्याचे आमचे नियोजन आहे. शाश्वत विकास करत असताना हरित ऊर्जा, पुनर्वापर अर्थव्यवस्था या क्षेत्रावर जास्त लक्ष केंद्रीत करत आहोत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
याचबरोबर, गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी राज्यांमधील स्पर्धेचे स्वागत करताना उपमुख्यमंत्र्यांनी भारताच्या आर्थिक विकासात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे प्रतिपादन यावेळी केले. ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे. राज्य शासन राबवित असलेल्या धोरणांमुळे गुंतवणूकदारांचा या राज्यावर विश्वास आहे. देशातील 20 टक्के स्टार्टअप व 25 टक्के युनिकॉर्न हे राज्यात असून महाराष्ट्र हे देशाची स्टार्टअप कॅपिटल आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा क्रमांक एकवर असून यापुढील काळातही तो पहिल्या क्रमांकावरच राहणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.