औरंगाबाद जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 09:52 AM2019-10-21T09:52:07+5:302019-10-21T09:59:53+5:30
निवडणूक अधिकाऱ्यांनी त्वरीत मशीन बदलल्याने मतदान सुरळीत सुरु
मुंबई : विधानसभा निवडणुकीचे आज मतदान पार पडत असून प्रशासनाकडून याची जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली होती. मात्र आज सकाळी 7 वाजेपासून सुरु झालेल्या मतदानावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील काही ठिकणी मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्याचे पाहायला मिळाले.
पैठण तालुक्यातील टाकली अंबड़ येथील बूथ क्रमांक 319 वर, 46 मतदान झाल्यावर ईव्हीएम मशीन बंद पडली. तर याच तालुक्यातील वाहेगांव बुथ क्रमांक 4 मधील ईव्हीएम मशीन 17 मतदान झाल्यापासुन बंद पडलेली आहे. मशीन बंद पडून दीड तास उलटल्यानंतर सुद्धा नवीन मशीन न आल्याने मतदारांना ताटकळत उभा राहवे लागले. त्यानंतर येथील ईव्हीएम मशीन बदलण्यात आली.
तर वैजापूर तालुक्यातील बोरसर येथील मतदान केंद्र क्रमांक 93 मधील मशिन बंद पडले. तसेच हिंगोणी मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन सुद्धा बंद पडली होती. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी त्वरीत मशीन बदलल्याने मतदान सुरळीत सुरु झाले. तर मतदान केंद्राववरील ईव्हीएम मशीन बंद पडताच प्रशासनाकडून त्वरित नवीन मशीन बदलण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाभर मतदान सुरळीत सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन किंवा व्हीव्हीपॅटमध्ये तांत्रिकदृष्ट्या अडचणी आल्याची माहिती मिळताच त्वरित बदलण्यात येत आहे. वाहेगाव व टाकली अंबडमध्ये अशाच अडचणी आल्या होत्या. मात्र त्या बदलण्यात आल्या असून मतदाना सुरळीतपणे सूर आहे. जनार्धन दराडे ( निवडणूक विभाग प्रमुख,पैठण)