ठाणे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ठाण्यातील सभेत बोलताना पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा 122 जागा जिंकला होता. त्यावेळी, अदृश्य हात पुढे आले, असे म्हणत शरद पवारांना टोला लगावला. त्यावेळी, आम्ही भाजपला पाठिंबा दिला नसता तर, हलं-डुलं अस्थिर सरकार राहिल असत. सरकारशी मी कधीही दगा-फटका केला नाही. शिवसेनेमुळेच सरकार स्थिर राहिलं, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
मी दोस्ती दिलखुलास होऊन करतो, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना टोला लगावला. तसेच, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी मी कधीही विरोध केला नाही, भारतरत्न देण्यासाठी एका समिती गठीत केलेली असते, त्या समितीचा हा निर्णय असतो, असे सिंग यांनी म्हटले होते. उद्धव यांनी सिंग यांच्या मुद्द्याला स्पर्श करताना, सावरकरांना नाही, तर कोणाला भारतरत्न द्यायचा? असे म्हणत कोणत्या वृत्तीकडे राज्य द्यायचे हा निर्णय घेणारी ही निवडणूक आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत. आम्हाला राम मंदिर हवे आहे. शिवशाही म्हणजे गोरगरीबांना सुखाचे क्षण देणारे राज्य हवे रामराज्य हवे. त्यांच्याप्रमाणे न्यायाने राज्य करायचे आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. समोर लढण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिल्लक राहिलेली नाही. त्यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती शिरल्याने काँग्रेसची ही परिस्थिती आली आहे. स्वातंत्र्यांच्या पूर्वी केवळ काँग्रेस या लढयात सहभागी झाले होते. पण, तो जमाना आता गेला आहे
गांधी टोपी असणारा विश्वासघात करीत नाहीत असा विश्वास काँग्रेसवर होता. पण, त्यानंतर सत्तेसाठी फोडाफोडीचे राजकारण सुरु केले. कँग्रेसवाले विसरले की देश म्हणजे केवळ भूखंड नाही. तर लोकांच्या इच्छेवर चालणारा देश असतो. विरोधक समोर नसल्याने डोक्यात मस्ती शिरु देऊ नका. जगभर मंदीचा विळखा पडतो आहे. विरोधकांकडे विकासाचा मुद्दा नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, घरगुती वीज दर तीनशे युनिटपर्यंतचा दर कमी करणार, शेतकऱ्यांना कमी दरात वीज देणार, आपले सरकार म्हणजे लोकांना असलेली आशा आहे, असे म्हणत वचननामा पूर्ण करणार असल्याचे ठाकरेंनी म्हटले.
भगवा म्हणजे धगधगती मशाल आहे, युती घट्ट पाहिजे. युतीबाबत अपप्रचार होत आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे कोणत्याही बंडखोराला थारा देणार नाहीत. शिवसेनाप्रमुखाचा मुलगा म्हणून सत्तेला बांधील नाही, गेलेली सत्ता शिवसैनिकांमूळे पुन्हा खेचून आणली आहे. मराठवाडा आणि विर्दभात उन्हात लोक येऊन सभेला बसत असतात. आई वडिलांची पुण्याई असल्याने ही लोक येत असतात. ठाणे वाढते आहे, ठाणे मोठे होत असताना वेगळे धरण का नसावे. काळू धरणाचा पाठपुरावा सुरु आहे. काळू धरण आता झाल्यातच जमा आहे. शहर तर आपण जिंकणार आहोत, जिल्ह्यातील मुंब्रा-कळव्यासह अठरा विधानसभा जागा जिंकणार, असे म्हणत उद्धव यांनी ठाण्यातील स्थानिक प्रश्नावरही भाष्य केलं. दिपाली सय्यद शिवसैनिकांची मुलगी आहे त्या स्वतःहून काम करीत आहेत, असेही उद्धव यांनी म्हटले.