मुंबई - लोकसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटकपक्षांनी स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २८८ मतदारसंघात विधानसभा तयारीचे आदेश संपर्कप्रमुखांना दिल्यानंतर त्यापाठोपाठ मनसेनेही गुरुवारी स्वबळावर २२५ जागा लढण्याची तयारी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेसाठी २८८ जागांच्या संघटनात्मक बांधणीवर भर देणार असल्याचे सांगत स्वबळाचे संकेत दिले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी तसेच महायुतीचे समीकरण जुळणार की फिसकटणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निकालानंतर मुंबईत रंगशारदा सभागृहात घेतलेल्या पहिल्याच बैठकीत कार्यकर्त्यांना २०० ते २२५ जागांवर निडणूक लढवण्याची तयारी करा, असे आदेश दिले. जागांसाठी महायुतीवर अवलंबून न राहता स्वबळावर लढण्याची मानसिकता मनसेकडून करण्यात आली आहे.
जिथे चांगली मते, तिथे उमेदवार- आगामी विधानसभेसाठी आमची युतीसाठी कोणाशीही चर्चा सुरू नाही. आतापर्यंत आम्ही स्वबळावर निवडणूक लढवल्या आहेत. ज्या मतदारसंघात आम्हाला आजपर्यंत चांगली मते मिळाली आहेत, तिथे निश्चित आमचे उमेदवार देऊ. मनसेचे निरीक्षक लवकरच राज्याचा दौरा करतील. त्यासंदर्भातील अहवाल राज यांना सादर केला जाईल, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
बच्चू कडूंचाही स्वबळाचा नारा- प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनीही राज्यात स्वतंत्रपणे विधानसभेच्या २० जागा लढविणार असल्याची घोषणा केली आहे.- संभाव्य उमेदवारांसोबत बैठक घेऊन विचारविनिमय केला जाईल. त्यानंतर आम्ही पुढील पाऊल टाकणार आहोत, असे कडू यांनी सांगितले.
उद्धवसेना अजमावत आहे ताकदउद्धव ठाकरे यांच्याकडूनही संपर्कप्रमुख, विभागप्रमुख, आमदारांच्या बैठका सुरू आहेत. एकत्र निवडणुकांना सामोरे जाऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तयारी करा, असे सांगितले जात आहे तर दुसरीकडे मतदारसंघनिहाय पक्षाची ताकद तपासली जात आहे.
पक्षसंघटना मजबूत करणार : पटोले- लोकसभेला काँग्रेसने राज्यातील सर्व ४८ जागांवर संघटनात्मक बांधणी केली होती, त्याचा फायदा काँग्रेसबरोबरच महाविकास आघाडीला झाला. - आताही विधानसभेसाठी २८८ जागांवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. - एकत्रित लढायचे असले तरी संघटनात्मक तयारी करायला लागते. त्याचा फायदा मित्र पक्षांनाही होतो, असेही ते म्हणाले.
आम्हाला चुरा तरी राहू द्या : सदाभाऊ खोत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनीही आपली खदखद व्यक्त केली. महायुतीतील बड्या मित्र पक्षांनीही समजून घ्यायला हवे, आम्ही काय बैलगाड्यांना फक्त वंगण घालायला बसलोय का? बुंदीचे लाडू तुम्ही खात असाल, तर चुरा तरी आमच्या नशिबी राहू द्या, अशा शब्दात त्यांनी मन मोकळे केले.