विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून आठवडा उलटत आला तरी राज्यात नवं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. भाजपा आणि शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात निर्माण झालेला सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे राज्यात नव्या सरकारचा शपथविधी होण्यास उशीर का होत आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. महायुतीने अद्याप विधिमंडळाच्या नेत्याचीही निवड केलेली नाही. मुख्यमंत्रिपद कुणाला द्यायचं हे निश्चित होत नसल्याने नव्या सरकारचा शपथविधी होत नसल्याचे बोलले जात होते. मात्र गुरुवारी रात्री झालेल्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर भाजपालाच मुख्यमंत्रिपद मिळेल आणि मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. काल रात्री झालेल्या बैठकीत अमित शाह यांनी फडणवीस यांना पुष्पगुच्छ देऊन तसे संकेत दिले होते.
मात्र तरीही राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित झाल्याची चर्चा असली तरी भाजपाने अद्याप आपल्या विधानसभा सदस्यांच्या दलाचा नेता का निवडला नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक आणि पक्षाच्या निरीक्षकांबाबतही काही घोषणा झालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या शनिवार आणि रविवारी अमावस्या आहे. त्या दिवशी शुभकार्य केलं जात नाही. त्यामुळे त्या दिवशी भाजपाच्या आमदारांची बैठक होण्याची शक्यता कमी आहे. रविवारी दुपारपर्यंत अमावस्या आहे. त्यामुळे त्यानंतर आमदारांचा बैठक होऊन पुढच्या काही दिवसांत नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्रिपदाचा वाद सुटला असला तरी महायुतीमध्ये मंत्रिमंडळातील जागावाटप आणि खातेवाटपावरून तिढा निर्माण झालेला आहे. भाजपाला मुख्यमंत्रिपदासह किमान २० मंत्रिपदं हवी आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १० ते १२ मंत्रिपदं हवी आहेत. अजित पवार गटालाही ८ ते १० मंत्रिपदं हवी आहेत. त्याबरोबरच वित्तमंत्रालयावर अजित पवार गटाचा डोळा आहे. दरम्यान, अमावस्या संपल्यानंतर महायुतीचे नेते पुन्हा एकदा दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. तसेच तिथे अमित शाह यांच्यासोबत पुन्हा बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.