"हा महायुतीच्या एकजुटीचा विजय, जनतेसमोर नतमस्तक", देेवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 03:46 PM2024-11-23T15:46:53+5:302024-11-23T15:48:16+5:30

Maharashtra Assembly Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आज लागलेल्या निकालांमध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये महायुती २२९ जागांवर आघाडीवर आहे. त्यामध्ये भाजपाला तब्बल १३३ जागांवर आघाडी मिळाली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Result: Devendra Fadnavis' reaction, "This is a victory for the unity of the Grand Alliance, a bow before the people". | "हा महायुतीच्या एकजुटीचा विजय, जनतेसमोर नतमस्तक", देेवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

"हा महायुतीच्या एकजुटीचा विजय, जनतेसमोर नतमस्तक", देेवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आज लागलेल्या निकालांमध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये महायुती २२९ जागांवर आघाडीवर आहे. त्यामध्ये भाजपाला तब्बल १३३ जागांवर आघाडी मिळाली आहे. दरम्यान, या विजयानंतर भाजपाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावूक प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा विजय राष्ट्रीय विचारांच्या संघटनांचा विजय आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याविरोधात जनजागृती करणारे विविध पंथांचे जे आमचे संत आहेत. त्यांचाही हा विजय आहे. अशा सगळ्यांचा हा विजय आहे. वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन ज्यांनी ही जनजागृती केली, त्यांचा हा विजय आहे. तसेच खऱ्या अर्थाने आमचे महायुतीचे जे लाखो कार्यकर्ते आहेत. त्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. 
माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रामदासजी आठवले. आमचे सगळे मित्रपक्ष या सगळ्यांचा हा विजय आहे. या सर्वांच्या प्रयत्नामुळे हा प्रचंड मोठा विजय मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

या विजयाच्या निमित्ताने मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही अभिनंदन करतो. त्यांनी महाराष्ट्रात येऊन आमच्या कार्यकर्त्यांमध्ये उर्जा भरली. आमच्या सगळ्या राष्ट्रीय नेतृत्वाने आम्हाला मार्गदर्शन केलं. तसेच आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी आमच्या विजयात हातभार लावला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही नतमस्तक आहोत. याच्यापेक्षा जास्त आज इथे काही बोलताच येत नाही. ज्या महाराष्ट्राच्या जनतेनं हे प्रेम दिलं आहे, तिला मी साष्टांग दंडवत घालतो. महाराष्ट्रात जो काही विषारी प्रचार झाला होता. त्याला महाराष्ट्राच्या जनतेनं आपल्या कृतीमधून उत्तर दिलं आहे, असे भावूक उदगार देवेंद्र फडणवीस यांनी काढले. 

मी म्हणालो होतो की आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. आम्ही चक्रव्युह तोडून दाखवू, तो चक्रव्युह तुटलेला आहे. तसेच महाराष्ट्र हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Result: Devendra Fadnavis' reaction, "This is a victory for the unity of the Grand Alliance, a bow before the people".

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.