महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर राज्यातील नव्या सरकारचं नेतृत्व आणि मंत्रिमंडळाबाबतचं चित्र आता जवळपास स्पष्ट होत आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्यानंतर आता भाजपाचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी जवळपास निश्चित झाल्याचं समोर येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारी सोडण्याच्या बदल्यात एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षासाठी गृहमंत्रालयासह अनेक मागण्यांची यादी भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत समोर ठेवल्याचं वृत्त आहे.
काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाची बाजू त्यांच्यासमोर मांडली. शिवसेनेमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये किमान १२ मंत्रिपदं शिवसेना शिंदे गटाला मिळावीत, अशी मागणी केली आहे. त्यात गृहमंत्रिपदासह नगरविकास आणि इतर महत्त्वाच्या खात्यांची मागणी त्यांनी केली आहे. त्यासोबतच एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या सभापतीपदावरही दावा ठोकल्याचं सांगण्यात येत आहे.
एवढंच नाही तर पालकमंत्रिपद देताना पक्षाचा योग्य तो सन्मान राखला जावा, अशी मागणीही एकनाथ शिंदे यांनी केली. मात्र ही मागणी करत असताना एकनाथ शिंदे यांनी आपण महायुतीसोबत भक्कमपणे उभे असल्याचंही सांगितलं आहे. दरम्यान, भाजपाने शिंदे गटाला गृहमंत्रिपद देण्यास नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. तर भाजपाने एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद किंवा केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर दिली आहे. तसेच राज्यातील पक्षविस्ताराचा विचार करून एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार असल्याचे समोर येत आहे.
नुकत्याच लागलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाला होता. महायुतीने २८८ पैकी २३० हून अधिक जागा जिंकल्या. त्यामध्ये भाजपाने एकट्याने १३२ जागांवर विजय मिळवला. तर पाच अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. शिवसेना शिंदे गटाने ५७ आणि अजित पवार गटाने ४१ जागांवर विजय मिळवला होता.