कोकणात महायुतीची जोरदार मुसंडी, तब्बल ३३ जागांवर आघाडी, ठाकरेंना मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 12:55 PM2024-11-23T12:55:02+5:302024-11-23T12:56:26+5:30
Maharashtra Assembly Election 2024: राज्यातील बहुतांश सर्वच भागात महायुतीला घवघवीत यश मिळालं असून, ठाकरेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणातही महायुतीने जोरदार आघाडी घेतली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलांनुसार कोकणातील ३९ जागांपैकी ३३ जागांवर महायुतीने आघाडी घेतली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. राज्यातील सर्व २८८ जागांचे कल समोर आले असून, त्यामध्ये महायुतीने २२० जारांवर आघाडी घेत निर्विवाद बहुमत मिळवण्याच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे. दरम्यान, राज्यातील बहुतांश सर्वच भागात महायुतीला घवघवीत यश मिळालं असून, ठाकरेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणातही महायुतीने जोरदार आघाडी घेतली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलांनुसार कोकणातील ३९ जागांपैकी ३३ जागांवर महायुतीने आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीला केवळ ३ जागांवर आघाडी मिळाली आहे. त्याशिवाय इतर उमेदवार ३ जागांवर आघाडीवर आहेत.
सध्या हाती आलेल्या कलांनुसार कोकणातील ३९ जागांपैकी ३३ जागांवर महायुतीमधील घटकपक्ष आघाडीवर आहेत. तर केवळ ३ जागांवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मिळाली आहे. तर ३ जागा इतरांच्या खात्यात जाताना दिसत आहेत.
कोकणातील मोठ्या आणि लक्षवेधी लढतींचा विचार करायचा झाल्यास लढतींचा विचार करायचा झाल्यास आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये वसईमध्ये बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर पिछाडीवर आहेत., पालघरमध्ये शिंदे गटाचे राजेंद्र गावित हे आघाडीवर आहेत. डोंबिवलीत भाजपाच्या रवींद्र चव्हाण यांनी आघाडी घेतली आहे. कळवा मुंब्रा मतदारसंघात जितेंद्र आव्हाड आघाडीवर आहेत.
कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आघाडीवर आहेत. ऐरोलीमध्ये भाजपाचे गणेश नाईक आघाडीवर आहेत. श्रीवर्धनमध्ये अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांनी विजयी आघाडी मिळवली आहे. तर रत्नागिरीमध्ये शिंदे गटाचे उदय सामंत यांनी आघाडी घेतली आहे. गुहागरमध्ये ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी आघाडी घेतली आहे. कणकवलीत भाजपाचे नितेश राणे हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. तर सावंतवाडीमध्ये शिंदे गटाचे दीपक केसरकर हे आघाडीवर आहेत.