आज लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये राज्यातील विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यातही या निकालांमध्ये शिवसेना ठाकरे गटाची मोठी पीछेहाट झाली असून, ठाकरे गटाला केवळ १६ जागांवरच विजय मिळताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचा निकाल हा अनपेक्षित आणि अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी या निकालाचं विश्लेषण केलं. त्यात ते म्हणाले की, हा निकाल पूर्णपणे अनपेक्षित आणि धक्कादायक आहे. पटला नाही तरी हा निकाल लागलेला आहे. हा निकाल कसा लागला, हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. तरीदेखील जे जिंकले त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि ज्यांनी ज्यांनी प्रामाणिकपणे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ज्या मतदारांनी मतं दिली त्यांना आम्ही धन्यवाद देतो. तसं पाहिलं तर लाटेपेक्षा त्सुनामीच आली, असं वातावरण या निकालांमधून दिसलं. पण हा निकाल सर्वसामान्य जनतेला पटलाय की नाही. हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, एकूण आकडे जे काही दिसताहेत ते आकडे पाहिल्यावर या सरकारला अधिवेशनामध्ये एखादं बिल मान्यतेसाठी आणण्याची गरजच नाही, असे आकडे आले आहेत. थोडक्यात जणू काही विरोधी पक्षच शिल्लक ठेवायचा नाही. एक दीड वर्षांपूर्वी भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे देशात एकच पक्ष राहील असं म्हणाले होते. यांना वन नेशन वन इलेक्शन आणि वन पार्टी या दिशेने आगेकूच करायची आहे की काय अशी भीतीदायक परिस्थिती आहे.
एकूणच हा निकाल बारकाईने पाहिल्यास संपूर्ण राज्यात आम्ही फिरत होतो, त्यामधून लोकांचा कल समजत होता. पण हा निकाल म्हणजे लोकांना महायुतीला मतं का दिलीत असा प्रश्न आहे. सोयाबिनला भाव मिळत नाही म्हणून दिली का? कापसाची खरेदी होत नाही म्हणून दिली का? महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेले जात आहेत, म्हणून दिली का? महिलांची सुरक्षितता वाऱ्यावर सोडून दिली म्हणून दिलीत का? नेमकं कळत नाहीये की कोणत्या रागापोटी अशी लाट उसळली आहे. हा निकाल अनाकलनीय आहे आणि यामागचं गुपित काही दिवसांमध्ये शोधावं लागेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.