Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. आजच्या निकालानंतर महाराष्ट्रात कोणाचे सरकार येणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. पण, अद्याप मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत कोणतीही स्पष्टता आलेली नाही. दरम्यान, महायुतीला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले जात आहे, तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांचे नाव घेत आहेत. आता मुख्यमंत्री नेमकं कोण होणार, याचा निर्णय एनडीएच्या बैठकीत होणार असल्याचं शिंदे यांनी म्हटले आहे.
एनडीएच्या बैठकीत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाबाबत आपला दावा सांगू शकतात. शिंदेंकडे मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याचे एक नाही, तर पाच कारणे आहेत. शिंदे भाजपसोबत बार्गेनिंग करण्यात यशस्वी ठरले, तर भाजपला पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते. शिंदेंकडे असे कोणती पाच कारणे आहेत, पाहा...
1. शिंदेगटाला मिळालेला जनादेशमहाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत एनडीएचा दारुण पराभव झाला. मात्र, भाजपच्या बरोबरीने जागा जिंकण्यात शिंदेसेनेला यश आले. विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळवले, त्यात एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा वाटाही मोठा आहे. मुख्यमंत्री बदलल्यास शिवसेनेचे कार्यकर्ते दुखावतील आणि भविष्यात त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो, असा युक्तिवाद शिंदे करू शकतात. याशिवाय, शिंदेगटाचे जवळपास 58 उमेदवार निवडून आले आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे भाजपवर दबाव टाकू शकतात.
2. भाजपकडे स्पष्ट बहुमत नाहीमुख्यमंत्रीपदासाठी भाजपवर दबाव टाकण्यासाठी एकनाथ शिंदेंकडे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे, भाजपला स्वबळावर बहुमत मिळालेले नाही. भाजपने 136-137 जागा जिंकल्या आहेत, पण बहुमताचा आकडा 145 आहे. त्यामुळे भाजपला इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.
3. अजित पवार विश्वासार्ह नेते नाहीअजित पवार महायुतीत सामील झाले असले तरी, त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. 2019 पासून आतापर्यंत अजित पवारांनी तीनदा यू-टर्न घेतलेला आहे. अजित पवारांची विचारधाराही भाजपशी जुळत नाही. बटेंगे तो कटेंगेसारख्या मुद्द्यावरुन अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तणाव निर्माण झाला होता. याउलट शिवसेनेची विचारधारा आधीपासून भाजपशी मिळतीजुळती आहे.
4. अडीच वर्षांच्या कामावर शिक्कामोर्तबएकनाथ शिंदे यांनी आपल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात कामांचा धडाका लावला होता. आमच्या कामाला जनतेने मतदान केल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी टोल फ्री, लाडकी बहिण अशा योजनांच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली होती. मुख्यमंत्री असताना त्यांनी या योजना जोरदारपणे राबवल्या होत्या. अशा स्थितीत शिंदे या आधारावरही सौदेबाजी करू शकतात.
5. भाजपसाठी पक्ष तोडलाएकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षासाठीच शिवसेनेत बंडखोरी केली. 2022 च्या बंडाच्या वेळी भाजप त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. बंडखोरीमुळे उद्धव गट आजही त्यांना देशद्रोही म्हणतो. दरम्यान, भाजपसोबत बोलणी करताना हा मुद्द्याही शिंदेंसाठी महत्वाचा आहे.