Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अजित पवारांची घरवापसी? उद्धव ठाकरे भाजपासोबत? महाराष्ट्रात सरकार स्थापनेची ५ समीकरणे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 10:09 AM2024-11-23T10:09:40+5:302024-11-23T10:16:24+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Results: निकालांमध्ये काही अनपेक्षित घटना घडल्यास राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते, असे बोलले जात आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीचा आज निकाल आहे. २०१९ मध्ये निकालानंतर अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. तशीच काहीशी राजकीय समीकरणे यावेळीही बदलू शकतात अशी शक्यता आहे. निकालांमध्ये काही अनपेक्षित घटना घडल्यास राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते, असे बोलले जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मुख्यमंत्रीपद. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रथमच मुख्यमंत्रीपदासाठी सर्व पक्षांची चढाओढ सुरु आहे. अशा पाच राजकीय शक्यता दिसत आहेत.
- पहिली शक्यता- अजित पवार गटाची घरवापसी
निवडणुकीच्या निकालात भाजप आणि शिंदे गट यांना मिळालेल्या जागा बहुमताला पुरेशा नसतील तर सत्तेच्या चाव्या अजित पवार गटाकडे येतील. अशा वेळी वेगळी समीकरणे निर्माण होऊ शकतात. अजित पवार दीर्घ कालावधीपासून मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यांच्या समर्थकांनी या संदर्भातील पोस्टर्सही लावले होते. अशा परिस्थितीत अजित पवार घरवापसी करून पुन्हा शरद पवारांसोबत गेल्यास त्यांना मविआतर्फे मुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकेल.
- दुसरी शक्यता- उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत
उद्धव भाजपमध्ये परतले उद्धव ठाकरे हे देखील पुन्हा भाजपासोबत येऊ शकतात. भाजप हा जर सर्वात मोठा पक्ष ठरला आणि उद्धव ठाकरे हे किंगमेकरच्या भूमिकेत आले, तर या दोघांमध्ये नवे समीकरण उदयास येऊ शकते. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेत दिले होते. राजकारणात काहीही होऊ शकते, असे फडणवीस म्हणाले होते. तसेच बिहारमध्ये भाजपने बंडखोर चिराग पासवान आणि फारकत घेतलेले नितीश कुमार यांना पुन्हा आपल्यासोबत घेतले आहे.
- तिसरी शक्यता- युती आणि आघाडी जैसे थे
महाराष्ट्राच्या निवडणुकीत कोणत्याही एका आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले, तर राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता फारशी दिसणार नाही. सध्या एकीकडे भाजपा, अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट यांची युती आहे. तर दुसरीकडे काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांची महाविकास आघाडी आहे. २०२३ पासून या समीकरणांमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. त्यामुळे युती आणि आघाडी 'जैसे थे' राहू शकतील.
- चौथी शक्यता- अपक्ष आणि छोटे पक्ष 'किंगमेकर'
आतापर्यंत महाराष्ट्रात युतीच्या राजकारणाचा बोलबाला होता. अपक्ष किंवा छोटे पक्ष हा घटक कधीच महत्त्वाचा नव्हता, पण यावेळी ज्याप्रकारे एग्जिट पोलची स्थिती दिसत आहे, त्यामुळे अपक्ष आणि छोट्या पक्षांचा राजकीय प्रभाव वाढू शकतो. बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सरकारमध्ये सामील होण्याबाबत उघडपणे सांगितले आहे. ज्या अपक्षांच्या विजयाची शक्यता जास्त आहे, अशा अपक्षांची मनधरणी करण्यात दोनही गट प्रयत्नशील आहेत.
- पाचवी शक्यता- शरद पवार पुन्हा 'गेमचेंजर'
यावेळी सर्वांच्या नजरा २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या हातून सत्ता हिसकावून घेणारे शरद पवार यांच्याकडे आहेत. गेल्या वेळचे आकडे कायम ठेवण्यात पवार यशस्वी ठरले तर ते मुख्यमंत्रीपदावर आपला दावा सांगू शकतात. अशा स्थितीत पवार मुख्यमंत्रीपदासाठी कोणत्याही दिशेने वाटचाल करू शकतात. भाजपाला पुन्हा सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ते इतर काही पक्षांची मोट बांधून नवी समीकरणे अस्तित्वात आणू शकतात.