"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 02:49 PM2024-11-29T14:49:26+5:302024-11-29T14:50:22+5:30

Maharashtra Assembly Election result 2024: राज्यातील किती मतदारसंघावर संध्याकाळी ५ नंतर  मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या? याचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे निवडणूक आयोगाने जाहीर करावेत, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवून केली आहे.

Maharashtra Assembly Election result 2024: Submit evidence including video footage of increased voting, Nana Patole's letter to Election Commission | "वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र

"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या निकालांविरोधात पराभूत उमेदवारांसह महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच काँग्रेसनेही संध्याकाळी वाढलेल्या  मतदानावर शंका उपस्थित केली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतांची आकडेवारी पाहता मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजल्यानंतर मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती मतदारसंघावर संध्याकाळी ५ नंतर  मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या? याचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे निवडणूक आयोगाने जाहीर करावेत, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवून केली आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात नाना पटोले पुढे म्हणतात की, निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार २० नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत ६५.२% मतदान झाले होते. दुस-या दिवशी म्हणजे २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जाहीर केलेली अधिकृत आकडेवारी ६६.०५% होती. निवडणूक आयोगाने स्वत: अधिकृतरित्या जाहीर केलेल्या आकडेवारीत १.०३% ची तफावत कुठून आली?  एका दिवसात तब्बल ९ लाख ९९ हजार ३५९ मतांची वाढ कशी झाली? मतांच्या टक्केवारीतील तफावत पाहता हा प्रकार गंभीर व चिंताजनक वाटत आहे. मतांच्या या वाढीबद्दल जनतेच्या मनातच शंका उपस्थित होत असतील तर त्या दूर करणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. निवडणूक आयोगाने स्वतः पुढे येऊन आपली भूमिका पुराव्यासह स्पष्ट करावी आणि जनतेच्या मनातील शंकांचे समाधानकारक उत्तर द्यावे, असे या पत्रात नमूद केले आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election result 2024: Submit evidence including video footage of increased voting, Nana Patole's letter to Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.