Maharashtra Assembly Rlection Results : राज्यासह अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, महायुतीने 225 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. यातील बहुतांश जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे, भाजपने आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी करत 132+ जागा मिळवल्या आहेत. या विजयाचे श्रेय ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जाते. गेल्या काही काळापासून त्यांनी स्थानिक पातळीवर काम करणे सुरू केले, त्याचेच फळ भाजपला यंदाच्या निवडणुकीत मिळाले आहे.
विशेष म्हणजे, भाजपने सलग तिसऱ्या निवडणुकीत शंभरीचा आकडा पार केला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजपला 122 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीसांच्या प्रयत्नांमुळे भाजपला 105 जागांवर विजय मिळवता आला. पण, राजकीय उलथापालथीमुळे त्यांना विरोधात बसावे लागले. यानंतर त्यांनी मायक्रो प्लॅनिंग केले आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला थेट 132+ जागा मिळवून देण्याचा करिष्मा केला आहे.
लोकसभेतील पराभवानंतर महाराष्ट्रातील भाजपचा कार्यकर्ता खचला होता. त्यावेळी केंद्रीय नेतृत्वाने संपूर्ण अधिकार देवेंद्र फडणवीसांना दिले. त्यांनी या संधीचे सोनं करुन दाखवत भाजपला मोठा विजय मिळवून दिला. या विजयासह महाराष्ट्रातील राजकारणाच्या इतिहासात भाजपने नवा अध्याय त्यांच्या नेतृत्वात लिहिल्याचे पाहायला मिळत आहे. आजच्या विजयानंतर भाजपने नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. सलग 3 वेळा शंभरीपार जाण्याचा पराक्रम आजपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याच पक्षाला जमलेला नाही. आजच्या निकालामुळे पुन्हा एकदा भाजपचे राज्यातील नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस हेच असल्याचे दिसून आले.