Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. अवघ्या राज्याचे लक्ष काय निकाल लागणार याकडे लागले आहे. सुरुवातीचे कल येण्यास सुरुवात झाली आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या कलांनुसार, महायुतीने २२० जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार ५८ जागांवर आघाडी घेतली आहे. तर अपक्ष १० जागांवर आघाडीवर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलपैकी एखाद-दुसरा अपवाद वगळता, जनतेचा कौल नेमका कुणाच्या दिशेने आहे, हे समजण्यात सपशेल अपयश आल्याचे पाहायला मिळत आहे.
‘एक्झिट पोल’ खूपच गोंधळलेले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. निवडणुकीचे हाती आलेले कल पाहता, केवळ पीपल्स पल्स आणि अॅक्सिस माय इंडिया या दोघांचे एक्झिट पोलचे आकडे त्या जवळ जाताना पाहायला मिळत आहेत. परंतु, बाकी सगळे एक्झिट पोल महाराष्ट्राची नाडी ओळखण्यात अपयशी ठरेल. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला असून, २०१४ च्या मोदी लाटेपेक्षाही महायुतीला जास्त जागा मिळताना दिसत आहे. महायुतीची ही त्सुनामी आली असून, महाविकास आघाडीला चांगलाच तडाखा बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे सांगितले जात आहे.
एक्झिट पोल पुन्हा ठरले फोल!
चाणक्य एक्झिट पोलने महायुतीला १५२-१६०, तर महाविकास आघाडीला १३०-१३८ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला होता. तर पोल डायरीने महायुतीला १२२-१८६ आणि महाविकास आघाडीला ६९- १२१ जागा मिळतील, असे म्हटले होते. दुसरीकडे, इलेक्टोरल एज एक्झिट पोलने महायुतीला ११८, तर महाविकास आघाडीला १५० जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवली होती. मॅट्रिक्स एक्झिट पोलने महायुतीला १५०-१७० जागा मिळतील. महाविकास आघाडीला ११०-१३० जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला होता. तसेच पी मार्क्यू एक्झिट पोलने महायुतीला १३७-१५७ जागा आणि महाविकास आघाडीला १२६-१४६ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवली होती. रिपब्लिक एक्झिट पोलने महायुतीला १३७-१५७, तर महाविकास आघाडीला १२६-१४६ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला होता.
कोणते एक्झिट पोल हाती आलेल्या कलांच्या जवळ पोहोचले?
पीपल्स पल्स एक्झिट पोलने महायुती १७५-१९५ जागा मिळू शकतील. तर महाविकास आघाडीला ८५ ते ११२ जागा मिळू शकतील. अपक्षांना ०७ ते १२ जागा मिळू शकतील, असा अंदाज व्यक्त केला होता. तर एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला १७८ ते २०० जागा मिळू शकतील. तर महाविकास आघाडीला ८२ ते १०२ जागा मिळतील. तर अन्य आणि अपक्षांना ०६ ते १२ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. या सर्व एक्झिट पोलच्या आकड्यांचा आढावा घेतल्यास जनतेच्या मनात नेमके काय सुरू आहे, याचा अंदाज कुणालाच घेता आला नाही, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, लोकसभा निकालातून महायुतीने घेतलेला धडा, लाडकी बहीण योजना, 'एक है तो सेफ है'चा नारा, ओबीसी मतांचे ध्रुवीकरण, जरांगे फॅक्टर निष्प्रभ, मराठा समाज भाजपाकडे परतला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संपूर्ण ताकदीने दिलेला पाठिंबा, काँग्रेस नेत्यांचा गाफिलपणा, जागावाटपात उद्धव ठाकरेंचा हट्ट, शरद पवारांबद्दलची सहानुभूती विशिष्ट भागापुरतीच मर्यादित, वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेते, उमेदवार आणि कार्यकर्त्यांना दिलेले बळ, अशी काही महत्त्वाची कारणे महायुतीने जोरदार मुसंडी मारण्यास कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे.