Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. अवघ्या राज्याचे लक्ष काय निकाल लागणार याकडे लागले आहे. जवळपास सर्वच ठिकाणचे चित्र स्पष्ट झालेले आहे. अनेक ठिकाणी उमेदवार विजयी घोषित करण्यात आले आहेत. महायुतीचा दणदणीत विजय झाला असून, महाविकास आघाडी चांगलीच चितपट झाल्याचे पाहायला मिळत आहे. अद्यापही अनेक ठिकाणचे अंतिम निकाल येणे बाकी असले तरी राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यातच पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात सुमारे १० ठिकाणी प्रचारसभा घेतल्या होत्या. त्यापैकी किती ठिकाणी भाजपासहमहायुतीचे उमेदवार विजयी झाले, याबाबतची माहिती आता समोर येत आहे.
पंतप्रधान मोदी यांनी ८ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात प्रचारसभा घ्यायला सुरुवात केली आणि याची सांगता मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर झाली. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार घणाघात केला होता. तर दुसरीकडे शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते पंतप्रधान मोदी यांच्या प्रचारसभांबाबत खिल्ली उडवत राहिले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांचा दाखला देत, पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात जेवढ्या सभा घेतील, तेवढा महाविकास आघाडीला फायदा होईल, असा खोचक टोला विरोधकांनी लगावला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुफडा साफ झाला. भाजपासह महायुतीच्या त्सुनामीचा मोठा तडाखा महाविकास आघाडीला बसल्याचे पाहायला मिळाले.
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा आणि निकाल
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळे येथे प्रचारसभा घेतली होती. धुळे शहर येथे भाजपा उमेदवार अनुप अग्रवाल यांना ०१ लाख १६ हजार ५३८ मते मिळाली. तर ४५ हजार ७५० मताधिक्यांनी त्यांचा विजय झाला. तर धुळे ग्रामीण येथे भाजपा उमेदवार राघवेंद्र पाटील यांना ०१ लाख ७० हजार ३९८ मते मिळाली. ६६ हजार ३२० मताधिक्यांनी त्यांचा विजय झाला.
- नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार राहुल ढिकले यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली. राहुल ढिकले यांचा ८७ हजारांच्या मताधिक्यांनी विजय झाला.
- अकोला येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतली होती. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपा उमेदवार विजय अग्रवाल आणि काँग्रेसचे उमेदवार साजीद खान पठाण यांच्यात लढत झाली. साजिद खान पठाण यांचा विजय मिळाला आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेड जिल्ह्यात सभा घेतली होती. येथील किनवट मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार भीमराव केराम विरुद्ध महाविकास आघाडीचे प्रदीप नाईक यांच्यात लढत झाली. त्यामध्ये, केराम यांना ९२ हजार ८५६ मते मिळाली. केराम हे ५ हजार ६३६ मताधिक्यांनी विजयी झाले.
- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतली. गडचिरोली चिमूर मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार बंटी भांगडिया हे आहेत. बंटी भांगडिया हे ०१ लाख १६ हजार ४९५ मतांसह ९ हजार ८५३ च्या मताधिक्यांनी विजयी झाले.
- सोलापूर जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतली होती. भाजपा सोलापूर उत्तर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजय देशमुख विरुद्ध महाविकास आघाडीचे महेश कोठे यांच्यात थेट लढत आहे. येथे भाजपा बंडखोर शोभा बनशेट्टी यांनीही अर्ज दाखल केला होता. या ठिकाणी विजय देशमुख यांना ०१ लाख १७ हजार २१५ मते मिळाली. देशमुख ५४ हजार ५८३ मताधिक्यांनी विजयी झाले.
- पंतप्रधान मोदींनी पुण्यात जाहीर सभा घेतली. कोथरुड मतदारसंघात भाजपाचे चंद्रकांत पाटील उमेदवार होते. ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांचा पराभव झाला. चंद्रकांत पाटील यांना ०१ लाख ५९ हजार २३४ मते मिळाली. चंद्रकांत पाटील ०१ लाख १२ हजार ०४१ मताधिक्यांनी विजयी झाले.
- छत्रपती संभाजीनगर येथेही पंतप्रधान मोदी यांनी प्रचारसभा घेतली होती. छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून अतुल सावे रिंगणात होते. एमआयएमच्या इम्तियाज जलील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार लहु शेवाळे यांचे आव्हान होते. अतुल सावे यांना ९३ हजार २७४ मते मिळाली. अतुल सावे २ हजार १६१ च्या मताधिक्याने विजयी झाले.
- नवी मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा झाली होती. येथील मतदारसंघात भाजपाकडून प्रशांत ठाकूर उमेदवार होते. त्यांना महाविकास आघाडीच्या शेकापच्या बाळाराम पाटील यांचे आव्हान होते. प्रशांत ठाकूर यांना ०१ लाख ८३ हजार ९३१ मते मिळाली. प्रशांत ठाकूर यांचा ५१ हजार ०९१ मताधिक्यांनी विजय मिळवला.
- मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर भाजपासह महायुतीच्या सर्व उमेदवारांसाठी मोठी प्रचारसभा झाली होती. मुंबईत आशिष, शेलार, अतुल भातखळकर, संजय उपाध्याय, प्रकाश सुर्वे, राहुल नार्वेकर, योगेश सागर, पराग शाह, पराग अळवणी, मिहीर कोटेचा, राम कदम, मनीषा चौधरी यांच्यासह बहुतांश उमेदवार विजयी झाले.
- तर ऐरोलीतून भाजपा उमेदवार गणेश नाईक यांचा ०१ लाख ४४ हजार २६१ मतांसह ९१ हजार ८८० मताधिक्याने विजय झाला. तसेच बेलापूर येथून भाजपा उमेदवार मंदा म्हात्रे यांनी ९१ हजार ८५२ मतांनी विजय मिळवला.
- एकंदरीत आकडेवारी पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या ठिकाणी प्रचारसभा घेतल्या, तेथील बहुतांश उमेदवार मोठ्या मतांनी आणि मोठ्या फरकाने विजयी झाल्याचे पाहायला मिळत आहे.