यंदाच्या निवडणुकीत एकसोएक घटना घडत आहेत. कुठे अधिकृत उमेदवार माघार घेतोय तर कुठे एक दोन मिनिटे उशीर झाल्याने उमेदवाराला अर्जच भरता येत नाहीय. सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले होते. आज बहुतांश बंडखोरांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. यामुळे बऱ्याच ठिकाणी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. असे असले तरी शरद पवार राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास उशीर झाला आणि त्याचा अर्ज कायम राहिला आहे. कोल्हापुरात उमेदवारानेच अर्ज मागे घेतल्याने मविआसमोर पेच निर्माण झालेला असताना आता सोलापुरात त्याहून मोठा पेच निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बंडखोर उमेदवार तोफिक शेख यांचा उमेदवारी अर्ज माघार घेऊनही कायम राहिला आहे. त्यांनी सोलापूर शहर मध्य, दक्षिण सोलापूर मधून बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणी ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्याने त्यांना दोन मिनिटे उशीर झाला आणि त्यांचा अर्ज कायम राहिला आहे.
भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या वकिलांनी तोफिक शेख यांचा अर्ज मागे घेण्यास हरकत घेतल्याने उमेदवारी अर्ज कायम राहिला आहे. शेख यांनी सोलापूर शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर या दोन्ही ठिकाणी अर्ज भरले होते. दोन्ही ठिकाणचे अर्ज कायम राहिल्याने आता एका मतदारसंघात निवडणूक लढविण्याची घोषणा शेख यांनी केली आहे.
माझ्या समाजातील वरिष्ठांनी समजूत काढल्याने मी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी केंद्रावर आलो होतो. मात्र मला यायला दोन मिनिटं उशीर झाल्याची हरकत घेतल्याने माझा अर्ज कायम राहिला आहे. सोलापूर शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर या दोनही ठिकाणचे उमेदवारी अर्ज कायम राहिले आहेत. अर्ज कायम राहिल्यामुळे सोलापूर शहर मध्यमधून निवडणूक लढणार आहे. तसेच दुसऱ्या मतदारसंघात माझा पाठिंबा कोणाला राहणार याबाबत आगामी काळात निर्णय घेणार असल्याचे शेख यांनी स्पष्ट केले आहे.