Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी, सामाजिक संतुलनाचाही प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 04:20 AM2019-12-31T04:20:52+5:302019-12-31T06:08:55+5:30
३६ जणांनी घेतली शपथ; आदित्य ठाकरे यांनाही स्थान
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात सोमवारी ३६ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. यात बहुतांश नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, तसेच सामाजिक व विभागीय संतुलन साधण्याचा प्रयत्न शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने केला आहे. शिवसेनेचे तरुण नेते आदित्य ठाकरे यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे वडिलांच्या मंत्रिमंडळात पुत्र मंत्री होण्याचा अपूर्व क्षण अनेकांनी अनुभवला.
विधिमंडळाच्या प्रांगणात पार पडलेल्या विस्तारात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह २५ कॅबिनेट व १० राज्यमंत्र्यांना शपथ दिली. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह आता ४३ मंत्री झाले आहेत. यापैकी १९ चेहरे नवे आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारात सामाजिक व विभागीय संतुलनाचा प्रयत्न झाला आहे. मराठा समाजासह ओबीसी, बौद्ध, जैन आणि अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व मिळाले आहे.
काँग्रेसने १५ आमदार निवडून आलेल्या विदर्भाला चार कॅबिनेट मंत्री दिले आहेत. राष्ट्रवादीने पश्चिम महाराष्ट्राला, तर शिवसेनेने मुंबई व कोकणाला झुकते माप दिले आहे. विदर्भाला सात कॅबिनेट व एक राज्यमंत्रिपद मिळाले असून, पश्चिम महाराष्ट्राला १0 मंत्री मिळाले आहेत. मराठवाड्याला सात आणि उत्तर महाराष्ट्राला सात मंत्रिपदे मिळाली आहेत. तरीही १२ जिल्ह्यांना प्रतिनिधित्व नाही. सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे १६, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे १६ तर काँग्रेसचे १३ मंत्री आहेत. विधानसभेचे अध्यक्षपदही काँग्रेसकडेच आहे.
एकूण ८ मंत्र्यांनी आज गांभीर्यपूर्वक, ३ मंत्र्यांनी अल्लाहला, तर २५ मंत्र्यांनी ईश्वरास साक्ष ठेवून शपथ घेतली. शिवसेना
आ. सुनील राऊत यांचा समावेश न झाल्यामुळे त्यांचे बंधू खा. संजय राऊत नाराज झाले व ते शपथविधी सोहळ्यास आलेच नाहीत.
काँग्रेसचे के. सी. पाडवी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अनेकांना धन्यवाद दिल्याने राज्यपाल कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त करून, त्यांना पुन्हा शपथ घ्यायला लावली. समोर बसलेले शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे यांना हे मान्य असेल तर मी काही म्हणत नाही, असेही राज्यपाल उद्गारले. जितेंद्र आव्हाड यांनी शपथ घेतल्यानंतर काही घोषणा दिल्या, तेव्हाही राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली. शपथ घेतल्यानंतर राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना न भेटताच आव्हाड गेले. शपथविधीला राष्टÑवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुप्रिया सुळे यांच्यासह शिवसेनेचे खासदार व विविध खात्यांचे सचिव उपस्थित होते.
वजनदार व लढवय्यांचे हे मंत्रिमंडळ
या मंत्रिमंडळात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, हसन मुश्रीफ, राजेश टोपे, अनिल देशमुख, नवाब मलिक, अमित देशमुख या अनुभवी मंत्र्यांसह धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड हे लढवय्ये नेते आहेत.
जुन्यांना वगळले
उद्धव ठाकरे यांनी सेनेतील नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. दिवाकर रावते, रामदास कदम, रवींद्र वायकर, दीपक केसरकर व तानाजी सावंत या माजी मंत्र्यांना डच्चू देण्यात आला. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, संजय राठोड, गुलाबराव पाटील व दादा भुसे यांनाच पुन्हा संधी मिळाली आहे.
तीन महिलांना संधी
काँग्रेसने वर्षा गायकवाड व यशोमती ठाकूर, तर राष्टÑवादीने आदिती तटकरे यांना संधी दिली. सेनेकडून नीलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र यावेळीही त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली.
चार अल्पसंख्याक
हसन मुश्रीफ, नवाब मलिक (राष्ट्रवादी), अस्लम शेख (काँग्रेस) व अब्दुल सत्तार (शिवसेना) या अल्पसंख्याक समाजातील चौघांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. फडणवीस सरकारमध्ये या समाजाचा एकही मंत्री नव्हता.
असेही अभूतपूर्व क्षण
उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यामुळे राज्यात वडील मुख्यमंत्री आणि मुलगा कॅबिनेट मंत्री असा अभूतपूर्व योग जुळून आला.
अजित पवार यांनी ३४ दिवसांत दोन वेगवेगळ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.