मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला भाजप-शिंदे गटाचा आज अखेर मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी 9 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे गटाकडून औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना संधी मिळेल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. पण, मंत्रिपदाने त्यांना हुलकावणी दिली. यावर शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
'सर्वांना न्याय देण्यासाठी...'मंत्रिमंडळ विस्तारानंतरसंजय शिरसाट यांनी माध्यमांसी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, 'आज शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. दोन पक्षाची युती असल्यामुळे विस्तारात काही अडचणी येत होत्या, त्या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. सर्वांना न्याय देण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात, त्या पार्श्वभूमीवरच हा आजचा मंत्रिमंडळ विस्तार झाला.'
'मी नाराज नाही''आजचा हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. हा शेवटचा नाही, भविष्यात दुसरा विस्तार होईल. त्यामुळे येत्या काळात अनेकांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. मी नाराज असण्याचे काहीच कारण नाही. पहिली प्राथमिकता जी होती, ती पूर्ण झाली. आता त्यानुसार काम सुरू होईल. एकनाथ शिंदेंसोबत आमची बैठक झाली, त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांना त्यांची भूमिका समजावून सांगितली. भाजप सेना युतीचे काम कसे करायचे, त्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे येत्या काळात भाजपसोबत काम करू,' अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिली.