बीड – महाराष्ट्रात कोरोनाचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. ऑक्सिजन, बेड्स आणि औषधांचा तुटवडा असल्याचं समोर येते. देशात अनेक ठिकाणी लोकं मदतीसाठी धावपळ करताना पाहायला मिळत आहे. अशातच बीड जिल्ह्यातील ४ मित्रांनी सरकारी मदतीची वाट न पाहता ५० बेड्सचं कोविड सेंटर उभारलं आहे. यासाठी त्यांना ३० लाख रुपये खर्च आला आहे. तो चौघांनीही बरोबर वाटून घेतला आहे.
शाळेत बनवण्यात आलेल्या कोविड सेंटरला प्रकाश देसारडा, डॉ. भगवान सानप, डॉ. गणेश देशपांडे आणि अभिजीत डुंगरवाल यांनी नो प्रोफिट-नो लॉस या संकल्पनेवर उभारलं आहे. याठिकाणी आलेल्या रुग्णांकडून सरकारी हॉस्पिटलपेक्षा कमी शुक्ल आकारलं जातं. अभिजीत डुंगरवाल यांनी सांगितले की, रुग्णांकडून थोडे का होईना पैसे घेण्याचं उद्दिष्ट एवढं की इथं येणारा प्रत्येक रुग्ण उपचारानंतर सन्मानाने घरी परत जाऊ शकतो. दया भावनेतून त्याच्या उपचार झालेत असं त्याच्या मनाला वाटू नये असं त्यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यातील शिरूर येथे आयडिएल इंग्लिश स्कूलमध्ये कोविड १९ सेंटर लोकांसाठी वरदान ठरत आहे. या कोविड सेंटरमध्ये १२ ऑक्सिजन बेड्स आणि ३८ जनरल बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी आलेल्या रुग्णाला ३ वेळचं अन्न सेंटरकडून पुरवलं जातं. संपूर्ण देशात महामारी पसरली आहे. अशावेळी सरकारसोबत आपणही मदतीला पुढं आलं पाहिजे. त्यासाठी स्वखर्चातून आम्ही कोविड सेंटर उभारल्याचं अभिजीत डुंगरवाल यांनी सांगितले.
सध्या कोविड सेंटरमध्ये ३७ सक्रीय रुग्ण
प्रकाश देसारडा यांनी सांगितले की, आमच्या कोविड सेंटरला १० डॉक्टर आणि ४० कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. १८ एप्रिलपासून आतापर्यंत १५० हून अधिक लोकांवर याठिकाणी उपचार करून घरी पाठवलं आहे. सध्याच्या स्थितीत ३७ सक्रीय रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याचसोबत पर्यायी ऑक्सिजन आणि औषधांचा साठाही उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.
कोविड सेंटरमध्ये काय आहे स्पेशल?
या कोविड सेंटरमध्ये १० स्पेशालिस्ट डॉक्टर आणि प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ उपलब्ध आहे.
याठिकाणी ECG, एक्स रे, ३ रुग्णवाहिका आणि ऑक्सिजनचे १०-१५ सिलेंडर कायम उपलब्ध आहेत.
सर्व रुग्णांना मोफत औषधं, होम क्वारंटाईनसाठी योग्य सुविधा पुरवली जाते.
त्याचसोबत रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी वेगळी व्यवस्थाही आहे.
सर्व कोरोनाबाधितांना ३ वेळचं जेवणाची व्यवस्था कोविड सेंटरकडून केली आहे.
संक्रमित रुग्णाच्या निधनानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारीही कोविड सेंटरने उचलली आहे.
परंतु दिलासादायक म्हणजे आतापर्यंत या कोविड सेंटरमध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्यांपैकी एकही रुग्ण दगावला नाही.
कोविड सेंटर उभारण्याची संकल्पना कशी आली?
प्रकाश देसारडा यांनी सांगितले की, एप्रिलच्या सुरुवातीच्या महिन्यात एका नातेवाईकांना भेटण्यासाठी मी पुण्याला गेलो होतो. तेथे अनेक रुग्ण पाहिले ज्यांना बेड्स उपलब्ध न झाल्याने त्यांचा जीव गेला. अशावेळी त्यांनी जवळच्या सहकाऱ्यांशी आणि गावकऱ्यांशी बोलून शाळेला कोविड सेंटरमध्ये रुपांतरित करण्याचं ठरवलं. ही कल्पना मी माझ्या ४ मित्रांसोबत शेअर केली. त्यांच्या मदतीने १८ एप्रिलपासून हे कोविड सेंटर उभं राहिलं आहे. सध्या ५० बेड्स उपलब्ध आहेत. येणाऱ्या काळात ही संख्या वाढवून जास्त सुविधा देण्याचाही प्रयत्न सुरू आहे.