महाराष्ट्र दिन उत्साहात !
By admin | Published: May 2, 2016 02:31 AM2016-05-02T02:31:56+5:302016-05-02T02:31:56+5:30
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५६वा वर्धापन दिन रविवारी राज्यभर ठिकठिकाणी ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी झालेल्या लढ्याच्या स्मृतींना
मुंबई / नागपूर : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५६वा वर्धापन दिन रविवारी राज्यभर ठिकठिकाणी ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी झालेल्या लढ्याच्या स्मृतींना उजाळा देत राज्य शासनासह विविध पक्ष व संघटनांनी ठिकठिकाणी समारंभांचे आयोजन केले. विदर्भात मात्र वेगळा सूर उमटला. विदर्भवादी संघटनांच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. शिवसेना व मनसे यांनी या आंदोलनाला चोख उत्तर देत अखंड महाराष्ट्राचे झेंडे फडकविले.
मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम झाला. त्या वेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर पोलिसांसह विविध दलांच्या पथकांच्या शिस्तबद्ध संचलनाची मानवंदना राज्यपालांनी स्वीकारली. मराठवाडा व विदर्भातील दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी
शासन ठामपणे उभे असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे, अशी ग्वाही राज्यपालांनी या वेळी केलेल्या भाषणात दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौकातील स्मारकास पुष्पचक्र वाहून संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले. विधान भवनात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह विधिमंडळ सचिवालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अखंड महाराष्ट्रासाठी विदर्भात सायकल रॅली
विदर्भवादी संघटनांच्या वतीने वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन छेडण्यात आले. माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी नागपुरात स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकावला. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने काळा दिवस पाळून भाजपाच्या जाहीरनाम्याची होळी करण्यात आली.
दुसरीकडे अखंड महाराष्ट्रासाठी शिवसेनेच्या वतीने अकोला शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. मराठा महासंघानेही स्वाक्षरी अभियान सुरू केले. आंदोलनांच्या या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.