मुंबई - भारतीय जनता पार्टी – शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करून निवडणूक लढविणाऱ्या भाजपाच्या बंडखोर उमेदवारांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश दिले आहे.
तुमसरमधील चरण वाघमारे, मीरा भाईंदरमधील गीता जैन, पिंपरी चिंचवडमधून बाळासाहेब ओव्हाळ, अहमदपूर लातूर येथून दिलीप देशमुख यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे. तसेच अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणारे भाजपा पालघर जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी भाजपाचा राजीनामा दिला आहे असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मात्र या बंडखोर उमेदवारांना भाजपाने घरचा रस्ता दाखविला असला तरी अद्यापही शिवसेना उमेदवाराविरोधात निवडणूक लढणाऱ्यांबाबत भाजपाने सोयीस्कर भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. यामध्ये कल्याण पश्चिममध्ये शिवसेनेचे विश्वनाथ भोईर यांच्याविरोधात निवडणुकीत उभे राहिलेले नरेंद्र पवार, सावंतवाडी येथे दीपक केसरकर यांच्याविरोधात उभे राहिलेले राजन तेली अशा नेत्यांची हकालपट्टी करण्याबाबत भाजपाने सध्या सावध भूमिका घेतली आहे.