Maharashtra Election 2019 : आपच्या उमेदवाराने जाहीरनामा दिला थेट बाॅण्ड पेपरवर लिहून
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 07:06 PM2019-10-10T19:06:33+5:302019-10-10T19:09:09+5:30
परतूर मंठा या विधानसभा मतदारसंघातील आपच्या उमेदवाराने आपला जाहीरनामा थेट बाॅण्ड पेपरवर लिहून दिला आहे.
पुणे : नेते मंडळी, राजकीय पुढारी माेठमाेठाली आश्वासने देतात परंतु ती पूर्ण करत नाहीत अशी तक्रार मतदार नेहमीच करत असतात. निवडूण आल्यानंतर आमदार मतदार संघात फिरकत सुद्धा नाहीत असा आराेप सुद्धा अनेकदा केला जाताे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलेली आश्वासने पूर्ण हाेतील याचा विश्वास निर्माण व्हावा यासाठी आम आदमी पक्षाच्या परतूर, मंठा या विधानसभेचे उमेदवार संताेष मगर यांनी आपला जाहीरनामा थेट बाॅण्ड पेपरवरच लिहून दिला आहे. तसेच दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यास नागरिकांना याेग्य ती कारवाई करण्याचा अधिकार देखील त्यांनी मतदारांना दिला आहे.
विधानसभेच्या निवडणुका येत्या 21 ऑक्टाेबर राेजी हाेत आहेत. त्यासाठी आता सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुकीच्या वेळी विविध राजकीय पक्ष तसेच उमेदवार मतदारांना माेठमाेठी आश्वासने देत असतात. परंतु अनेकदा ती आश्वासने निवडणुकांपूर्तीच मर्यादित राहतात. निवडणुका झाल्यावर त्या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे नेते केवळ आश्वासने देतात परंतु त्याची पूर्तता करत नाहीत, असा समज मतदारांमध्ये झालेला असताे. हा समज खाेडून काढण्यासाठी मगर यांनी थेट आपला जाहीरनामा शपथपत्रावर लिहून दिला आहे. या जाहीरनाम्यात त्यांनी विविध 11 आश्वासने दिली आहेत. निवडुण आल्यावर ती पूर्ण न केल्यास फसवणुक केल्याची कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार त्यांनी मतदारांना दिला आहे.
याबाबत लाेकमतशी बाेलताना मगर म्हणाले, बऱ्याच लाेकांकडून ऐकले हाेते की उमेदवार आश्वासने देतात परंतु ती पूर्ण करत नाहीत. मतदारांचा देखील तसा समज झालेला असताे. एखाद्या उमेदवाराने प्रामाणिक भावनेतून आश्वासने दिली असतील तर त्याने ती मतदारांना लिहून देण्यास काहीही हरकत नाही. मी दिलेली आश्वासने निवडूण आल्यास मी शंभर टक्के पूर्ण करणार आहे. अन्यथा मतदारांना माझ्यावर फसवणुकीची कारवाई करण्याचा अधिकार मी दिला आहे.