Maharashtra Election 2019: ... तर उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू आले नसते का, अजित पवारांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 09:36 AM2019-10-11T09:36:21+5:302019-10-11T09:37:26+5:30
Maharashtra Election 2019: अजित पवारांनी अचानक राजीनामा दिल्याने राज्यात खळबळ उडाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांच्या भावनिक झाल्यावरुन, त्यांच्या अश्रूवरुन उद्धव ठाकरेंन त्यांना लक्ष्य केलं होतं. अजित पवारांचे अश्रू हे कर्माचे आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. याबाबतचा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना पवारांच्या जागी बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू आले नसते का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. ईडीकडून शरद पवारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिखर बँक घोटाळ्यातील तरतुदीनुसार हा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकणी अजित पवारांनी खुलासा केला आहे.
अजित पवारांनी अचानक राजीनामा दिल्याने राज्यात खळबळ उडाली होती. त्यामुळे हा राजीनामा भावनिक होऊन दिला होता का, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, 'राजीनाम्याचा निर्णय हा भावनिक होऊन घेतला नव्हता. केवळ पत्रकार परिषदेत मी काही क्षण भावनिक झालो होतो, मी ते कंट्रोल करायचा प्रयत्न केला, पण मला कंट्रोल झालं नाही. त्यामुळे, मी राजीनाम्याचा निर्णय खूप विचाराअंती घेतला होता, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
तसेच, माझे वडिल वारल्यानंतर माझ्या वडिलांच्या जागी मी शरद पवारांना पाहतोय. उद्धव ठाकरेंना काय बोलावं हे त्यांचा अधिकार आहे. गेल्या 5 वर्षात त्यांनी काय केलं, याच उत्तर त्यांच्याकडे नाही. त्यामुळे ते आमच्या अश्रूवर बोलतात. उद्धव ठाकरेंनी एकदा परदेशातून मासे आणले होते, दुर्दैवाने ते मासे मेले. मग, हे महाराज दोन दिवस घराबाहेरच पडले नाहीत, कारण मासे मेले मासे मेले असं करत. तुम्हाला मासे मेले तर दु:ख होतंय. मग आमचं ब्लड रिलेशन आहे. मग दु:ख होणारच. समजा, बाळासाहेब असते आणि त्यांच्याबाबतीत असे काही घडले असते, तर उद्धव ठाकरेंच्या डोळ्यातून पाणी आलं नसतं का? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला.