Maharashtra Election 2019 : १०० हून अधिक साखर कारखानदार निवडणूक रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 04:50 AM2019-10-11T04:50:58+5:302019-10-11T04:55:01+5:30
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपकडून सर्वाधिक साखर कारखानदारांना उमेदवारी देण्यात आली आहे.
- पोपट पवार
कोल्हापूर : ‘उसाशिवाय साखरेला अन् साखरेशिवाय राजकारणाला गोडवा येत नाही’ या म्हणीचा प्रत्यय सध्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या फडातच दिसून आला आहे. एक दोन नव्हे, तर तब्बल १०० हून अधिक साखर कारखानदार विधानसभेच्या रणांगणात आपले नशीब आजमावत असल्याने त्यांची ही राजकीय आखाड्यातील साखरपेरणी फळाला येणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विशेष म्हणजे साखर कारखानदारीतून राजकारण अन् राजकारणातून सत्ता हे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या साखर सम्राटांना सर्वच पक्षांनी पायघड्या अंथरल्याने सहकार चळवळीचा आत्मा ठरलेली साखर कारखानदारी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा केंद्रबिंदू ठरू पाहत आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपकडून सर्वाधिक साखर कारखानदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे साखर कारखानदारांपासून काहीसे दूर असणाºया भाजपने यंदा २८ साखर कारखानदारांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे. तर स्थापनेपासूनच सहकारी तत्त्वाचा अजेंडा घेऊन वावरणाºया राष्ट्रवादी काँग्रेसने साखर कारखान्यांशी संबंधित असणाºया ३० जणांना उमेदवारी दिली आहे.
शिवसेनेकडून यंदा १५ साखर कारखानदार रिंगणात उतरले असून, काँग्रेसनेही १२ साखर कारखानदारांना उमेदवारी देऊन मैदानात उतरवले आहे. दुसरीकडे कोणत्याच पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने जवळजवळ ११ साखर सम्राटांना अपक्ष म्हणून रिंगणात उडी घ्यावी लागली आहे. दरम्यान राहुरी, कागल, माजलगाव, कोपरगाव, करमाळा, पंढरपूर, वाई, पाटण, करवीर, इस्लामपूर यांसह ११ विधानसभा मतदारसंघात साखर कारखानदारांमध्येच थेट लढत होत असल्याने या मतदारसंघाकडेही संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक ५४ जण
कृष्णा, भीमा, कोयना, वारणा, पंचगंगा या नद्यांच्या मुबलक पाण्याने सुबत्ता आलेल्या पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखानदारीची मुळे राजकारणाशी घट्ट जोडली गेली आहेत. परिणामी, साखर कारखानदारांना वगळून राजकीय मैदान मारणे कोणत्याच पक्षाला परवडणारे नाही. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही साखर कारखानदारीशी संबंधित पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल ५४ उमेदवार विधानसभा निवडणुकीचा फड गाजवित आहेत.
मराठवाड्यातही 22 जणांना उमेदवारी
पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या मराठवाड्यातल्या काही भागातही साखर कारखान्यांभोवतीच राजकारण केंद्रित झाले आहे. त्यामुळे तेथील आठ जिल्ह्यांतील २२ साखर कारखानदार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
प्रमुख उमेदवार आणि त्यांचे साखर कारखाने
- पंकजा मुंडे :
वैजनाथ सहकारी,
परळी (भाजप)
- अशोक चव्हाण : भाऊराव चव्हाण कारखाना, नांदेड (काँग्रेस)
- राधाकृष्ण विखे : विठ्ठलराव विखे-पाटील कारखाना, प्रवरानगर
(भाजप)
- बाळासाहेब थोरात :
भाऊसाहेब थोरात कारखाना, संगमनेर (काँग्रेस)
- अजित पवार : सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, बारामती (राष्ट्रवादी)
- हसन मुश्रीफ : संताजी घोरपडे कारखाना, कागल (राष्ट्रवादी)
- अमित देशमुख : विकास सहकारी, लातूर (काँग्रेस)
- सुधाकरपंत परिचारक :
पांडुरंग कारखाना, श्रीपूर (भाजप)
- अतुल भोसले : यशवंतराव मोहिते कारखाना, कºहाड (भाजप)
- विश्वजित कदम :
सोनहिरा कारखाना,
पलूस-कडेगाव (काँग्रेस)
- शंभूराज देसाई : बाळासाहेब देसाई सहकारी साखर
कारखाना, पाटण (शिवसेना)
- सुभाष देशमुख : लोकमंगल साखर कारखाना, सोलापूर (भाजप)
- संदिपान भुमरे : संत
एकनाथ सहकारी कारखाना, पैठण (शिवसेना)