Maharashtra Government : 'अण्णा, उठा उठा सत्ता गेली, आंदोलनाची वेळ आली'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 11:03 AM2019-11-22T11:03:50+5:302019-11-22T11:21:18+5:30
दिल्लीतून काँग्रेस श्रेष्ठींनी सत्ता स्थापनेसाठी हिरवा कंदील दाखवल्यावर आता पुढील चर्चेसाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची प्रत्येकी तीन नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे.
मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरू असून लवकरच सत्ता स्थापनेची कोंडी फुटण्याची शक्यता आहे. सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असून राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करणार असल्याची दाट शक्यता आहे. दिल्लीतून काँग्रेस श्रेष्ठींनी सत्ता स्थापनेसाठी हिरवा कंदील दाखवल्यावर आता पुढील चर्चेसाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची प्रत्येकी तीन नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे. यामध्ये सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होईल. याच दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंवर निशाणा साधला आहे.
'अण्णा, उठा उठा सत्ता गेली, आंदोलनाची वेळ आली' असं म्हणत सत्तास्थापनेवरुन जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांना टोला लगावला आहे. आव्हाड यांनी गुरुवारी (21 नोव्हेंबर) आपल्य़ा ट्विटर अकाऊंटवरून 'अण्णा उठा कामाला लागावे लागेल, रामदेव बाबा आहेत तयार, उठा उठा सत्ता गेली, आंदोलनाची वेळ आली' असं ट्वीट केलं आहे. यासोबतच त्यांनी अण्णा हजारे यांचा आंदोलनादरम्यानचा झोपलेला एक फोटोही पोस्ट केला आहे.
अण्णा उठा कामाला लागावे लागेल
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 21, 2019
रामदेव बाबा आहेत तयार
उठा उठा सत्ता गेली
आंदोलनाची वेळ आली pic.twitter.com/EiXGmCnXZq
भाजपासोबत विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेने आता राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. या तिन्ही पक्षांमध्ये सध्या बैठकांचे सत्र सुरू आहे. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीदेखील हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता तीन पक्षांची मंत्रिपदांच्या वाटपावर चर्चा होईल. यानंतर त्यांच्याकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल. शिवसेना राष्ट्रवादी, काँग्रेससोबत गेल्यामुळे सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागेल.
साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरच्या 'माझ्या शापामुळे हेमंत करकरेंचा मृत्यू झाला' या स्टेटमेंटवर मोदी इतके नाराज झाले की काल त्यांनी रागाच्या भरात तिला शिक्षा म्हणून संसदेच्या संरक्षणविषयक सल्लागार समितीवर घेतलं.#मेरा_देश_जल_रहा_है
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 21, 2019
प्रज्ञा सिंह यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीत स्थान दिल्याने पुन्हा एकदा विरोधकांनी भाजपावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी देखील प्रज्ञा सिंह यांच्यासह पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले आहे. जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले की, माझ्या शापामुळे हेमंत करकरेंचा मृत्यू झाला या प्रज्ञा सिंह ठाकूरच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी इतके नाराज झाले की त्यांनी रागाच्या भरात प्रज्ञा सिंह यांना शिक्षा म्हणून संसदेच्या संरक्षणविषयक सल्लागार समितीत स्थान दिलं असं म्हणत भाजपाच्या या भूमिकेवर टीका केली आहे.
पेरीयार रामास्वामी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वैचारिक दहशतवादी म्हणणाऱ्या रामदेवबाबांना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला. देशात ज्या काळामध्ये चातुर्वर्ण्य मनुवाद्यांची वर्णव्यवस्था समाजाला पोखरत होती, त्या काळात या दोन महानायकांनी त्यांच्याविरूद्ध लढा दिला. रामदेवबाबांना बाबा कोण म्हणतं, हे मला माहीत नाही. त्यांनी माफी मागावी, असे आव्हाड म्हणाले.