राज्याची उपराजधानी नागपूर असून पूर्वी या शहराला त्यांच्या वैभवासाठी ओळखले जायचे. मात्र आज नागपूरला क्राईम कॅपिटल म्हणून ओळखले जात असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूरच्या प्रचारसभेत केले आहे. तसेच नागपूरचे प्रतिनिधित्व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असल्याने नागपूरातच त्यांना गुन्हा थांबवण्यात अपयश येत असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
नागपूरच्या वर्तमानपत्रात आज (गुरुवारी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोसहीत सरकारची जाहिरात आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक सरकारला पाच वर्षात बांधता आले नाही. तसेच या दोन्ही स्मारकाचे जलपूजन, भूमिपूजन सरकारने केले, मात्र एक इंचभरही काम झाले नसल्याचे सांगत भाजपा सरकारवर शरद पवारांनी टीका केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री आज सांगतात की ५० हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना केली. कोणाला केली? नुसता बोलाचा भात आणि बोलाचीच कढी फक्त रेटून खोटं बोलून राज्यातील जनतेची फसगत करायची, अशी सध्याच्या राज्यकर्त्यांची वृत्ती आहे. त्याचप्रमाणे वाढत्या बेरोजगारीची चिंता सरकारला नाही. कारखाने बंद झाले म्हणून अनेक लोकांचे रोजगार गेले. जेट एअरवेज कंपनी बंद पडली, त्यामुळे २२ हजार तरुणांना रोजगार गमवावा लागला असल्याचे शरद पवार म्हणाले. राज्यात परिवर्तन करून तुम्हाला एक दिशा दाखवायची आहे. ज्याप्रमाणे छत्तीसगढ, राजस्थान, मध्य प्रदेश येथील राज्यातील लोकांनी भाजपाला परतावून लावले, त्यापद्धतीने महाराष्ट्रातही आपल्याला परिवर्तनाची भूमिका घ्यायची असल्याचे देखील शरद पवारांनी यावेळी सांगितले.