नवी दिल्ली - हरियाणा आणि महाराष्ट्र येथे 21 ऑक्टोबरला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन्ही राज्यात भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी जाणार आहेत. महाराष्ट्रात नरेंद्र मोदींची पहिली रॅली 14 ऑक्टोबरला होणार असून मोदींच्या 9 सभा राज्यभरात होतील. तर हरियाणात 17 ऑक्टोबरपासून 4 सभा मोदींच्या होणार आहेत.
भारतीय जनता पार्टीकडून निवडणुकीच्या प्रचारासाठी कलम 370 हटविणे, तिहेरी तलाक आणि एनआरसी मुद्दा तसेच एअरस्ट्राईक हे मुद्दे प्रामुख्याने वापरण्यात येणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 19 ऑक्टोबरला महाराष्ट्रात प्रचाराची सांगता केली जाणार आहे त्यामुळे त्यापूर्वी 4 दिवस मोदी राज्यभरात प्रचार करणार आहेत. तसेच भाजपाचे अन्य नेते पीयुष गोयल, प्रकाश जावडेकर, नितीन गडकरी, स्मृती इराणी, मुख्तार अब्बास नक्वी, योगी आदित्यनाथ आणि इतर नेतेही राज्यभरात प्रचारासाठी येणार आहेत.
याचसोबत राज्यभरात 10 हजार सक्रीय कार्यकर्ते तळागळात निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरण्यात येणार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 23 जागांवर महाराष्ट्रात विजय मिळाला होता. तर शिवसेनेला 18 जागांवर विजय मिळाला होता. तर हरियाणामध्ये भाजपाने एकूण 90 जागांपैकी 75 जागांहून अधिक जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवलं आहे.
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचे पंतप्रधान यांच्यासोबत बैठक होणार असल्याने त्यात व्यस्त आहेत. पुढील काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे पंतप्रधान जिनपींग यांच्यासोबत विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी भेटणार आहेत. सध्या राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची चांगली प्रतिमा आहे. त्यामुळे मोदी उशिराने प्रचारात भाग घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच यंदाच्या निवडणुकीत भाजपाने अकार्यक्षम असलेल्या नेत्यांना घरचा रस्ता दाखविला आहे. अनेक नेत्यांची तिकीट कापण्यात आले आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय निवडणूक समिती हरियाणा आणि महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांना विधानसभेची उमेदवारी नाकारली असल्याचं दिसून आलं आहे.