Maharashtra Election 2019 : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा: जिल्हाधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 09:08 PM2019-10-10T21:08:20+5:302019-10-10T21:08:57+5:30
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा सर्वोच्च आणि पवित्र अधिकार प्रदान केला आहे.
मुंबई: भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा सर्वोच्च आणि पवित्र अधिकार प्रदान केला आहे. राज्यात २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदाराने लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आपल्या अधिकाराचा हक्क बजावावा आणि नवोदित मतदारांनी लोकशाहीच्या या महत्वाच्या घटनेत सहभाग घेऊन मतदानाला प्राधान्य द्यावे असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी आज विलेपार्ले येथे मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे आयोजित "स्वीप" या कार्यक्रमांतर्गत केले.
याप्रसंगी बोरीकर म्हणाले, "मतदार संघ, मतदान केंद्र, मतदार संख्या व उपलब्ध भौगोलिक क्षेत्र यांचा विचार करता मुंबई उपनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यात २६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण ७२ लाख २६ हजार ८२६ एवढी मतदारसंख्या असल्याने मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी याकरिता पूर्णतः सक्रिय आहे त्याकामी सक्षम निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे".
भारत निवडणूक आयोग यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारांमध्ये मतदानाच्या हक्काबाबत जनजागृती होण्याकरिता 'स्वीप' (सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशनल अँड इलेक्टोरल पार्टीसिपेशन प्रोग्रॅम) हा उपक्रम राबविला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये आज मतदार जागृतीकरिता एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये नागरिकांना आणि नवोदित मतदारांना आवाहन करण्याकरिता हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार जितेंद्र आणि हिंदी चित्रपटांतून खलनायकाची भूमिका बजावणारे श्री. मुकेश ऋषी यांनी सहभाग घेतला.
"मतदानाचा हक्क बजावून आपण जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचाच एक भाग बनतो. देशाप्रती आपल्या उत्तरदायित्वाचे भान ठेवत प्रत्येक भारतीय नागरिकाने मतदानाच्या अधिकाराचा वापर प्राधान्याने करावा", असे आवाहन सिनेअभिनेता श्री. जितेंद्र यांनी उपस्थितांना केले. तर "देशभक्तीच्या भावनेचे प्रकटीकरण मतदानाच्या हक्कातून सक्षमरित्या करता येऊ शकते, असे मत श्री मुकेश ऋषी यांनी याप्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की जोपर्यंत या देशातील प्रत्येक नागरिक सजगपणे प्लास्टिकचा वापर टाळत नाही, तोपर्यंत आपल्याला घातक प्लास्टिकपासून मुक्तता मिळणार नाही. हे लक्षात घेता, प्लास्टिकचा वापर टाळावा, असे आवाहन देखील त्यांनी याप्रसंगी केले.
देशाच्या हितासाठी आणि विकासासाठी मतदानाचा हक्क बजावणे अत्यंत आवश्यक आहे हा संदेश जनमानसात पोहचविण्यासाठी अनेक मान्यवर कलाकारांनी याप्रसंगी विविध कलांच्या माध्यमातून जनजागृती करत मतदानाचे मह्त्त्व पटवून दिले. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय कब्बडीपट्टू श्रीमती सुवर्णा बारटक्के, अभिनेता व प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. राहुल चव्हाण, दिव्यांग सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनील दशपुत्रे आणि पर्यावरण तज्ज्ञ श्रीमती अश्विनी बोरुडे या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी श्रीमती सोनाली मुळे, महानगरपालिका सहआयुक्त श्री. भारत मराठे आणि ‘स्वीप’ समितीचे सदस्य श्री. सुभाष दळवी यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष मेहनत घेतली. याप्रसंगी सर्व उपस्थितांनी मतदानाचा हक्क बजावण्याबाबत शपथ घेतली. या कार्यक्रमाला मतदारांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.