प्रविण मरगळे
मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्याने राज्यावर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यामुळे काळजीवाहू सरकारही बरखास्त झालं. देवेंद्र फडणवीसांनीही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावरुनही त्यांनी आपली ओळख बदलून महाराष्ट्र सेवक अशी केली. देवेंद्र फडणवीसांसोबत अन्य महत्वाचे मंत्री पंकजा मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे, जयकुमार रावल यांनी ट्विटरवरील नावात बदल केला आहे.
मात्र राज्यातील माजी कृषीमंत्री असलेले डॉ. अनिल बोंडे आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ट्विटरवर अद्यापही नावापुढे मंत्रिपदाचा उल्लेख कायम ठेवल्याने विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होत आहे. राज्यात कोणत्याही पक्षाचं सरकार स्थापन होत नाही त्यामुळे राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपती राजवट सुरु असल्याने राज्याचा कारभार राज्यपालांच्या अधिपत्याखाली गेलेला आहे. राज्याचे प्रमुख म्हणून राज्यपाल काम सांभाळत आहेत.
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी कृषीमंत्र्यांना टीकेचं लक्ष्य केलं आहे. कदाचित कृषीमंत्र्यांना माहित नसेल राज्यात राष्ट्रपती राजवट सुरु आहे. अनिल बोंडे यांना माहित नसेल आपला पराभव झाला आहे. पराभवाच्या धक्क्यातून बोंडे सावरले नसतील. मंत्रिपद पुन्हा आपल्याला मिळेल अशी अपेक्षा असल्याने हे अनिल बोंडे आणि सदाभाऊ खोत यांनी ट्विटरवर मंत्रिपदाचा उल्लेख कायम ठेवला आहे. मात्र याबाबत अनिल बोंडे यांना विचारले असता तात्काळ हे पद हटविण्याची सूचना संबंधितांना देतो असं सांगितले.
राज्यातील या सत्तास्थापनेचा घोळ मुख्यमंत्रिपदावरुन झाला आहे. मागील ५ वर्ष मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी राज्य कारभार सांभाळला. त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार बनणार अशी अपेक्षा भाजपाला होती. मात्र शिवसेनेच्या मागणीमुळे भाजपाच्या सत्तास्थापनेचे स्वप्न भंगलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपाविला.
त्यानंतर राज्यपालांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना कारभार पाहण्यास सांगितले. मात्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्रिपदही देवेंद्र फडणवीसांकडे राहिलं नाही. मात्र सत्तास्थापनेच्या घोळात ना कोणाचं सरकार बनलं ना कोणी मुख्यमंत्री झालं. त्यामुळे अखेर देवेंद्र फडणवीसांनी सोशल मीडियावर स्वत:ची नवीन ओळख निर्माण केली आहे. ट्विटरवर देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ला महाराष्ट्र सेवक म्हणून संबोधित केलं आहे.