पुणे - राज्यातील सत्तास्थापनेत विरोधी बाकांवर बसायला तयार असणारी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या मदतीने सत्तेत बसणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी पक्षाला रामराम करून भाजपात भरती झालेले आणि आमदार असलेले अनेक जण राष्ट्रवादीशी संपर्क साधत आहे. भाजपाचे 15 ते 20 आमदार आमच्या संपर्कात आहे. मात्र त्यांचे नाव आता मी जाहीर करणार नाही, त्यांच्यासाठी ते अडचणीचं होईल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे.
सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची आज पुण्यात बैठक आयोजित केली आहे. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, भाजपामध्ये गेलेले आणि काही अपक्ष आमदारही आमच्या संपर्कात आहेत. मात्र आम्ही मेगा भरती करणार नाही तर मेरीट भरती करणार आहोत. सध्या पक्ष यशाच्या शिखरावर आहे. पण ही भरती करत असताना तेथील स्थानिक लोकांना, पक्षातील निष्ठावंतांना आणि नवीन तरुण मंडळींना विचारत घेऊन निर्णय घेणार आहोत असं सांगितले आहे.
तसेच भाजपची विचारधारा व आमची विचारधारा वेगळी आहे.आम्ही कधीही त्यांच्या बरोबर जाणार नाही. यावेळी पाटील यांना शिवसेनेबरोबर कसे काय असे विचारले असता, दगडापेक्षा वीट मऊ असे उत्तर देऊन त्यांनी, जनतेच्या मनातील सरकार आम्ही देणार पण तेही स्थिर सरकार देण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या नेत्यांच्या बैठकीत तयार झालेल्या किमान समान कार्यक्रमातील काही मुद्द्यावर काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांना आक्षेप आहे. शरद पवारांशी भेट झाल्यानंतर या बैठकीत ते या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. सोनिया गांधी आणि शरद पवार यांची बैठक यशस्वी झाली तर शिवसेना नेते संजय राऊत आणि अनिल देसाई हे सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. तसेच शरद पवारांसोबत उद्धव ठाकरेही सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.
भाजपाशिवाय कोणाचं सरकार येणार नाही दादरमध्ये भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक गेल्या तीन दिवसांपासून सुरु होती. या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाशिवाय राज्यात कोणाचं सरकार येणार आहे. सरकार आपलचं येणार आहे असा दावा केला. त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही हा दावा केला.