महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 10:40 PM2024-11-23T22:40:36+5:302024-11-23T22:52:10+5:30
काँग्रेसने झारखंडमधील भाजपचा पराभव योग्य म्हटला आहे, तर महाराष्ट्रातील भाजपच्या विजयावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Maharashtra Election Result 2024: महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी (23 नोव्हेंबर 2024) जाहीर झाले आहेत. महायुतीने महाराष्ट्रात नेत्रदीपक विजय नोंदवला आहे, तर झारखंडमध्ये इंडिया आघाडीने बाजी मारली आहे. दरम्यान, काँग्रेसने महाराष्ट्र निवडणूक निकालांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. "लेव्हल प्लेइंग फील्ड" (समान संधी) ची परिस्थिती विस्कळीत झाल्याने निवडणुकीच्या निष्पक्षतेवर शंका निर्माण झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजपचा पराभव केला होता, मात्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना मोठा विजय कसा मिळाला, हा तपासाचा विषय आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान असे वातावरण निर्माण झाले होते, त्यामुळे निष्पक्ष आणि संतुलित लढत होऊ शकली नाही, असा आरोपही काँग्रेसने केला. या निवडणुकीच्या निकालाचे सखोल विश्लेषण करणार असल्याचे काँग्रेसने म्हटले. तसेच, निवडणुकीत वापरलेली रणनीती आणि संसाधनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपने 148 पैकी 132 जागा कशा जिंकल्या, हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.
Just 5 months ago, when the BJP fought in the name of Modi and to make him the PM, Maharashtra rejected the party. And now the same party gets 132 out of 148 seats.
— Pawan Khera 🇮🇳 (@Pawankhera) November 23, 2024
Is Fadnavis more popular than Modi?
Or is the electoral process questionable? https://t.co/XYR86DNI47
विधानसभेत एवढा मोठा विजय कसा शक्य आहे?
महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या निकालांची विधानसभा निकालांशी तुलना करताना काँग्रेसने म्हटले की, लोकसभेत भाजपचा पराभव केल्यानंतर विधानसभेत एवढा मोठा विजय कसा काय शक्य झाला? हा विरोधाभास पक्षासाठी चिंतेचा विषय आहे. काँग्रेस नेते पवन खेडा म्हणाले की, झारखंडमध्ये ध्रुवीकरणाचे राजकारण हरले आहे. तिथे आरएसएस आणि भाजपने आदिवासी भागाला प्रयोगशाळा बनवण्याचा प्रयत्न केला. हिमंता बिस्वा सरमाला तिथे पोस्टर बॉय बनवण्यात आले. पोस्टर बॉयने झारखंडमध्ये कोणतीही कसर सोडली नाही. त्यामुळे तेथील जनतेने भाजपला पूर्णत: नाकारले आणि काम करणाऱ्या सरकारला पुन्हा चांगल्या बहुमताने विजयी केले.
खेरा पुढे म्हणतात, महाराष्ट्रातील अनपेक्षित निकालांचा आम्ही विचार करत आहोत. भाजपने नरेंद्र मोदींच्या नावावर लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात मते मागितली होती. त्यावेळी मतदारांनी भाजपचा पराभव केला. याच राज्याने भाजपला 4-5 महिन्यांच्या कालावधीत 148 पैकी 132 जागा दिल्या. हा कसला स्ट्राइक रेट आहे? हा स्ट्राइक रेट शक्य आहे का? आम्ही निवडणूक पारदर्शकतेचा विचार करत आहोत.
दरम्यान, एकीकडे काँग्रेसने झारखंडमधील भाजपच्या पराभवावर फार बोलण्यास टाळले, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील विजयावर शंका उपस्थित केली आहे. काँग्रेसने म्हटले की, महाविकास आघाडीतील मित्रपक्षांसोबत निवडणूक प्रक्रिया आणि भाजपच्या निवडणूक प्रचार पद्धतींचा आढावा घेणार आहोत. पक्ष आणि आघाडी कुठे कमकुवत झाली आणि त्या जागांवर भाजपने आपली स्थिती कशी मजबूत केली, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.
महायुतीचा निकाल
महाराष्ट्रातील शेवटच्या अहवालानुसार, भाजपने 132 जागांवर विजय मिळवला आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 57 जागा जिंकल्या आहेत. याशिवाय, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनेही 41 जागा जिंकत मोठा विजय मिळवला आहे.