मुंबई - विधानसभा निवडणुकीचे निकाल २४ तारखेला लागणार आहे मात्र तत्पूर्वी विविध एक्झिट पोलने घेतलेल्या आकडेवारीत राज्यात पुन्हा भाजपा-शिवसेना महायुती बाजी मारणार असल्याचं चित्र आहे. पोल डायरी या संस्थेने केलेल्या सर्व्हेत भाजपाला १२१-१२८ जागा, शिवसेना ५५-६४ जागा, काँग्रेस ३९-४६ जागा, राष्ट्रवादी ३५ ते ४२ जागा, वंचित बहुजन आघाडी १-४ जागा, मनसे - १-५ जागा जिंकेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मात्र या पोल डायरी संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार राज्यातील २५ मतदारसंघ असे आहेत ज्याठिकाणी महायुती आणि महाआघाडी यामध्ये अटीतटीची लढत आहे. यामध्ये जो पक्ष बाजी मारेल त्यानुसार महायुती आणि महाआघाडीतील विजयी आकड्यांचे गणित ठरणार आहे.
- धुळे शहर - अनिल गोटे(लोकसंग्राम), हिलाल माळी(शिवसेना), राजवर्धन कदमबांडे(अपक्ष)
- भुसावळ - संजय सावकरे(भाजपा) जगन सोनावणे(राष्ट्रवादी)
- बडनेरा - रवी राणा(अपक्ष), प्रीती बंड(शिवसेना)
- रामटेक - मल्लिकार्जन रेड्डी(भाजपा), उदयसिंग यादव(काँग्रेस), आशिष जयस्वाल(अपक्ष)
- अहेरी - अंबरिशराजे आत्राम(भाजपा), दिपक आत्राम(काँग्रेस), धर्मबाबा आत्राम(राष्ट्रवादी)
- नांदेड दक्षिण - राजश्री पाटील(शिवसेना), मोहन हंबार्डे(काँग्रेस)
- लोहा - मुक्तेश्वर धोंडगे(शिवसेना) दिलीप धोंडगे(राष्ट्रवादी)
- बसमत - जयप्रकाश मुंदडा(शिवसेना) चंद्रकांत नवघरे(राष्ट्रवादी)
- गंगाखेड - विशाल कदम(शिवसेना) मधुसुदन केंद्रे(राष्ट्रवादी) रत्ताकर गुट्टे(रासपा)
- पाथरी - मोहन फड(भाजपा), सुरेश वरपुडकर(काँग्रेस), जगदिश शिंदे(अपक्ष)
- सिल्लोड - अब्दुल सत्तार(शिवसेना), कैसर आझाद शेख(काँग्रेस), प्रभाकर पालोडकर(अपक्ष)
- औरंगाबाद पश्चिम - संजय शिरसाट(शिवसेना) संदीप शिरसाट(वंचित बहुजन आघाडी)
- नाशिक पूर्व - बाळासाहेब सानप(राष्ट्रवादी) राहुल ढिकले(भाजपा) गणेश उन्हावणे(काँग्रेस)
- विक्रमगड - हेमंत सावरा(भाजपा) सुनील भुसरा(राष्ट्रवादी), संतोष वाघ(वंचित बहुजन आघाडी)
- शहापूर - पांडुरंग बरोरा(शिवसेना), दौलत दरोडा(राष्ट्रवादी) हरिषचंद्र खंडवी(वंचित ब.आघाडी)
- कल्याण पश्चिम - विश्वनाथ भोईर(शिवसेना) प्रकाश भोईर(मनसे) नरेंद्र पवार(अपक्ष)
- वांद्रे पूर्व - विश्वनाथ महाडेश्वर(शिवसेना) तृप्ती सावंत(अपक्ष), जीशान सिद्दीकी(काँग्रेस)
- खेड आळंदी - सुरेश गोरे(शिवसेना) दिलीप मोहिते(राष्ट्रवादी) हिरामण कांबळे(वंचित आघाडी)
- पुणे कंटोन्मेंट - सुनील कांबळे(भाजपा), रमेश बागवे(काँग्रेस) मनिषा सरोदे(मनसे)
- बीड - जयदत्त क्षीरसागर(शिवसेना), संदीप क्षीरसागर(राष्ट्रवादी), अशोक हिंगे(वंचित ब. आघाडी)
- करमाळा - रश्मी बागल(शिवसेना), संजय पाटील(राष्ट्रवादी), नारायण पाटील(अपक्ष)
- कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण(काँग्रेस), अतुल भोसले(भाजपा), उदयसिंह उंडाळकर(अपक्ष)
- कणकवली - नितेश राणे(भाजपा), सुशील राणे(काँग्रेस), सतीश सावंत(शिवसेना)
- हातकणंगले - सुजित मिणचेकर(शिवसेना), राजु आवळे(काँग्रेस)
- शिरोळ - उल्हास पाटील(शिवसेना), राजेंद्र पाटील(अपक्ष)
तसेच या पोल डायरीच्या सर्व्हेनुसार अनेक धक्कादायक निकालांचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कर्जत जामखेडमधून राम शिंदे यांच्याविरोधात रोहित पवार निवडून येण्याची शक्यता सांगितली गेली आहे. त्याचसोबत विलासराव देशमुखांचे दोन्ही चिरंजीव विधानसभेत धडक देतील असं सांगण्यात आलं आहे. इंदापूर येथून भाजपाचे हर्षवर्धन पाटील बाजी मारतील. अणुशक्तीनगरची जागा पुन्हा शिवसेनेकडून राष्ट्रवादी खेचून घेईल सांगितलं आहे. भिवंडीच्या दोन्ही जागा सत्ताधाऱ्यांकडून विरोधक काढून घेतील. प्रदीप शर्मा यांचा नालसोपारा विधानसभेतून पराभव होईल याठिकाणी पुन्हा क्षितीज ठाकूर यांना संधी मिळणार असल्याचं सांगितले आहे.
दरम्यान, जालनामधून शिवसेनेचे नेते अर्जन खोतकर यांनाही पराभवाचा सामना करु लागू शकतो असं सांगण्यात आलं आहे. पुसदमधून राष्ट्रवादीचे निलय नाईक यांचा पराभव होऊ शकतो. यामध्ये यवतमाळ वणी येथील एक जागा मनसेचे राजू उंबरकर हे निवडून येतील असं सांगण्यात आलं आहे. साकोली मतदारसंघात भाजपाचे परिणय फुके यांचा पराभव करुन नाना पटोले विधानसभेत निवडून येतील असं सांगण्यात आलं आहे. त्याचसोबत विदर्भातील कामठी, नागपूर उत्तर येथे काँग्रेस निवडून येईल असं सांगितले आहे.
बाळापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीला विजय मिळेल असं सांगितले आहे. तर परतूरमधून बबनराव लोणीकर यांना पराभव सहन करावा लागू शकतो. धारावीत वर्षा गायकवाड यांचाही पराभव होऊन या मतदारसंघात शिवसेना विजयी होईल असं सांगितले आहे. परांडातून शिवसेनेचा तानाजी सावंत यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर दक्षिणमधून भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करत ऋतुराज पाटील निवडून येतील.