एकनाथ खडसेंची डोकेदुखी वाढवणार?, आता 'त्या' कारभाराची चौकशी होणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 08:50 PM2022-07-28T20:50:53+5:302022-07-28T20:51:47+5:30
Eknath Khadse : एकनाथ खडसेंची पत्नी अध्यक्ष असलेल्या जिल्हा दूध सहकारी कारभारातील अनियमिता आणि भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी शासनातर्फे समिती नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगाव : शिंदे-फडणवीस सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना धक्का देत त्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. एकनाथ खडसेंची पत्नी अध्यक्ष असलेल्या जिल्हा दूध सहकारी कारभारातील अनियमिता आणि भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी शासनातर्फे समिती नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरीकडे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून जिल्हा दूध संघावर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. या प्रकरणातील तक्रारदार तसेच दूध संघाचे माजी सुरक्षा अधिकारी नगराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
जिल्हा दूध संघाचे माजी सुरक्षा अधिकारी नागराज पाटील यांनी जिल्हा दूध संघाच्या कारभारातील अनियमितता आणि भरती प्रक्रियेतील मोठ्या गैरव्यवहार झाल्याची तक्रार शासनाकडे केली होती. मात्र, गेल्या मविआ सरकारकडून याबाबत कोणतीच दखल घेण्यात आली नव्हती. त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारने याच्या चौकशीसाठी समितीची नियुक्ती केली आहे. तसेच विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली आहे. यासंबंधी राज्य शासनाचे उपसचिव एन. बी. मराळे यांनी आदेश काढले आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारकडून घेण्यात आलेल्या या निर्णयावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे म्हणाले की, ही कारवाई म्हणजे मोठी राजकीय खेळी असल्याचा आरोप केला आहे. दूध संघाच्या कारभारात एक रुपयाचा भ्रष्टाचार झालेला नाही. जर काही भ्रष्टाचार झाला असेल तर, दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आपण स्वतःच करू असे म्हटले आहे. तसेच, संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करणे आणि चौकशी समिती नियुक्त करण्यामागे मोठे राजकारण असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.