राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार कुटुंबामध्ये फूट पडल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आमने-सामने आल्या आहेत. तसेच निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून पवार कुटुंबातील सदस्य एकमेकांवर शाब्दिक वार पलटवार करत आहेत. दरम्यान, आज शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना खोचक टोला लगावला आहे. आधी अजित पवार आदेश द्यायचे, आता त्यांना दिल्लीचे आदेश ऐकावे लागतात. आता दिल्लीवरून आदेश आले तर काकींचा अर्ज मागे घेऊन अजित पवार यांना इच्छा नसताना अर्ज दाखल करावा लागेल, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, दिल्लीवरून आदेश आले असतील तर दादा काहीपण करतील. आधी शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना अजित पवार हे स्वत: आदेश द्यायचे. आज त्यांना दिल्लीचा आदेश ऐकावा लागतो. अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि दिल्लीवरून आदेश आला की, तुमचा अर्ज कायम ठेवा आणि काकींचा अर्ज मागे घ्या, तर अजितदादांना ते मनाविरुद्ध असलं तरी ऐकावं लागेल. त्यामुळे ते त्याबाबतीत काय करतात हे येणाऱ्या काळात पाहावं लागेल, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी अनेक आमदारांना सोबत घेत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पवार कुटुंबामध्येही उभी फूट पडली होती. तसेच पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार ह्या नणंद भावजय आमने सामने आल्या आहेत. ही लढत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात होत असली तरी प्रत्यक्षात शरद पवार आणि अजित पवार अशीच ही लढत आहे. त्यामुळे आता बारामतीमधील मतदार कुणाला कौल देतात, याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे.